
हिंदुस्थानी हवाई दलाने स्वदेशी लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब खगांतक-243 ची यशस्वी ड्रॉप चाचणी केली आहे. यामुळे आता हिंदुस्थानची स्वदेशी हल्ला करण्याची क्षमता वाढली आहे. खगांतक-243 नागपूरच्या जेएसआर डायनॅमिक्स या स्टार्टअप कंपनीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत मिळून तयार केला आहे. भारतीय हवाई दलाने याची पहिली चाचणी पोखरणमध्ये सुखोई एसयू-30 एमकेआयने केली होती.
ग्लाइड बॉम्बला क्रूझ क्षेपणास्त्र सारखे स्वतःचे इंजिन नसते. हे हवेत निर्माण झालेल्या लिफ्टच्या साहाय्याने लक्ष्याकडे सरकते. याची किंमत कमी असल्यामुळे ते मोठ्या संख्येने बनवता येतात. यात 125 किलोचे एमके-81 वॉरहेड बसवण्यात आले आहे. हा बॉम्ब 144 ते 180 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत हल्ला करू शकतो. याच्या मदतीने लढाऊ विमाने शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सीमेत न जाता दूरच्या लक्ष्यांना लक्ष्य करू शकतात.


























































