
<< साधना गोरे
[email protected]
सध्या विद्यानंद बापटांचं सण-उत्सवानिमित्त होणारं ध्वनिप्रदूषण व वाहतूककोंडी यांविषयीचं वक्तव्य समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे. त्यांचे बिनतोड मुद्दे, त्यातील तर्कशुद्धता वाखाणण्याजोगी आहेच, पण त्यांची ओघवती मराठी आजच्या काळात विरळाच. ती संस्कृतप्रचुर असली तरी यांत्रिक वाटत नाही. आजवर आपण ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘मूलभूत स्वातंत्र्य’ यांसारखे शब्दप्रयोग ऐकले, वापरले, पण बापटांचा नवा प्रयोग म्हणजे ‘स्खलन स्वातंत्र्य.’ पुणे शहराचा एकेकाळचा ‘विद्येच्या माहेरघरा’चा नावलौकिक मिळवून द्यायला अखेर खराखुरा विद्वान साक्षात विद्यानंदच पुढे सरसावला म्हणायचं!
आता नमनाला घडाभर तेल वाहून झालेलंच आहे, तर आपले आजचे शब्द आहेत – विद्या, विद्वान आणि वेदना. विद्या आणि विद्वान यांचा संबंध विद्वानांच्या सहज लक्षात येईल, पण या शब्दांशी ‘वेदना’चा संबंध लक्षात यायला लेख संपेपर्यंत थांबावं लागेल, तर विद्वान किंवा विद्या हे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात. संस्कृतमधील ‘विद्’ धातूपासून ते तयार झाले आहेत. या ‘विद्’मध्ये जाणणे, शिकणे, समजणे, अनुभवणे, मानणे अशा विविध अर्थच्छटा सामावलेल्या आहेत.
‘वेद’ हा शब्दही याच ‘विद्’पासून तयार झाला आहे. प्राचीन काळी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद म्हणजे ज्ञानाचं भंडार मानले जात. आज आपण ‘वैद्य’ हा शब्द आयुर्वेदानुसार औषधोपचार करणारा तज्ञ किंवा डॉक्टर या अर्थाने वापरतो, पण प्राचीन काळी संस्कृतमध्ये वेदांची माहिती असलेला, पंडित, आध्यात्मिक व्यक्ती यांनाही ‘वैद्य’ म्हटलं गेलं आहे. नंतरच्या काळात मात्र आयुर्वेदातील जाणकार एवढ्याच मर्यादित अर्थाने हा शब्द रूढ झाला.
वैद्य आणि वेदना या शब्दाचं एक अनोखं नातं आहे. वेदना म्हणजे जाणीव किंवा बोध. हा शब्द आपण स्वतःस कळणारे, स्वतःस जाणता येणारे पण दुसऱ्याला सांगता न येण्यासारखा आत्मानुभव, दुःख, कळ, शूळ इ. अर्थांनी वापरतो. खरे तर वेदना शब्दाच्या मूळ अर्थात सुखानुभूती आणि दुःखानुभूती या दोन्हींचा समावेश आहे, पण अलीकडे दुःख किंवा दुखणे एवढ्याच मर्यादित अर्थाने तो मोठ्या प्रमाणात वापरला जाताना दिसतो. वैद्याचा संबंध नेहमी शारीरिक व मानसिक वेदनांनी ग्रस्त असणाऱ्यांशी येतो. या वेदनांचे निदान करणाऱ्याला चिकित्सक म्हणजे वैद्य म्हटलं जातं.
संस्कृत ‘विद्’पासूनच विद्वान शब्द तयार झाला आहे. इथं विद् म्हणजे जाणकार, समजदार असा अर्थ आहे. एखाद्या शब्दापुढे विद् उपसर्ग लावला की, त्याचा अर्थ जाणकार कसा होतो पाहा – भाषाविद् म्हणजे भाषेचा जाणकार. अगदी याच प्रकारे फारसी आणि उर्दूमध्ये शब्दाच्या मागे ‘दाँ’ प्रत्यय लावला जातो. उदा. कानूनदाँ, फारसीदाँ इ. फारसीतील ‘दाँ’ आणि ‘विद्’ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत.
‘विद्या’ हा शब्दही याच जातकुळातला. ‘विद्या’पासून विद्यार्थी, विद्यालय, विद्यापीठ, विद्यावाचस्पपती असे अनेक शब्द तयार झाले. महाभारतातील एका प्रसिद्ध पात्राचे नाव विदुर आहे. हे पात्र बुद्धिमान व जाणकार आहे. ‘विदुर’ या शब्दाचा अर्थही तोच आहे. या पात्राची कार्यशैली पांडवांसाठी नेहमी फायदेशीर असे. त्यामुळे ‘विदुरनीती’सारखा शब्दप्रयोगही वापरला जातो. या शब्दाबाबत एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संस्कृतमध्ये धूर्त आणि षडयंत्रकारी व्यक्तीलाही विदुर म्हटलं गेलं आहे.
या संस्कृत ‘विद्’ शब्दाचं केवळ भारतीय भाषांतीलच शब्दांशी नातं आहे असं नव्हे, तर युरोपीय भाषांमधील शब्दांशीही त्याचा संबंध आहे. संस्कृत ‘वेद’ हा शब्द जाणणे, ज्ञान या अर्थाशी संबंधित आहे. हा वेद शब्द अवेस्ता (फारसीचं प्राचीन रूप) मध्ये ‘वैद’, स्लावमध्ये ‘वेडे’, लॅटिनमध्ये ‘वीडियो’ किंवा ‘वीडेयर’, इंग्रजीत ‘वाइड’ किंवा ‘वाइस, ‘व्हिजन’ (टेलिव्हिजमध्ये हेच ‘व्हिजन’ आहे), जर्मनमध्ये ‘वेस्सेन’ इ. रूपांत पाहायला मिळतो. हे सगळे शब्द त्या-त्या भाषांमध्ये पाहणे, जाणणे, ज्ञान या अर्थाने वापरले जातात. हा ‘विद्’ ग्रीकमध्ये ‘आइडेन’ रूपात दिसतो. आइडेन म्हणजे पाहणे. ग्रीकमधून हा शब्द इंग्रजीत गेला आणि ‘आइडिया’, ‘आइडियल’ इ. रूपांत वापरला जाऊ लागला.
संस्कृतमध्ये ‘संविति’ किंवा ‘संविती-संवित्ती असे शब्द आहेत. त्याचा अर्थ आहे – पूर्ण ज्ञान, योग्य समज, जाणीव. कोकणी भाषेत मात्र ‘वीद’ म्हणजे निर्बुद्धी. आता हा एवढा अर्थविपर्यास कसा झाला ते एक गोयंकारांनाच ठाऊक! पण एखादा तर्कहीन, असंबद्ध बोलत असेल, मतप्रदर्शन करत असेल तर त्याला ‘आला मोठा विद्वान!’ असं औपरोधिक म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहेच की! कोकणीत ‘वीद’चं तसंच झालं असावं.



























































