
सण-उत्सवांच्या काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रकार घडत असतात. ते रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वधर्म समभावाची भूमिका घेत वर्षभरात होणाऱया सर्वच सण-उत्सवांसाठी एकच वार्षिक आदेश जारी केला आहे. महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱयांमधील अन्नावर एफडीएचा ‘कडक वॉच’ राहणार आहे. या अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी हा आदेश वर्षभरासाठी लागू असणार असून प्रत्येक वेळी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही.
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई व अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या काळात प्रसाद व अन्नदान सेवा केली जाते. हजारो-लाखो भाविक त्याचा लाभ घेत असतात. नागरिकांना मिळणारा तो प्रसाद सुरक्षित असावा यासाठी एफडीएने पंबर कसली आहे. प्रत्येक वेळी सण-उत्सव आला की नव्याने आदेश काढावा लागतो. ती पद्धतच तुकाराम मुंढे यांनी मोडीत काढली आहे. दरवर्षी ठरलेले सण, उत्सव, यात्रा, ऊरूस आणि धार्मिक पर्व येतच असतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वतंत्र आदेश काढण्याऐवजी दरवर्षी एकच सर्वसमावेशक आदेश काढणे अंमलबजावणीच्या दृष्टीने उचित ठरेल अशी भूमिका घेत एफडीएने ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ यावेळी जारी केला आहे.
हिंदू आणि शीख धर्मियांच्या सणांमध्ये विशेषकरून मिठाई, खवा, तूप, पनीर आणि सुकामेवा यांची मागणी वाढते तर मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांच्या सणांमध्ये मांसाहारी पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळीची शक्यताही वाढते. ते रोखण्यासाठी एफडीएने वर्षभराचे विशेष कॅलेंडर तयार केले आहे. प्रत्येक सण-उत्सवासाठी नियमावली बनवली असून सण सुरू होण्यापूर्वी 21 दिवसांपासून आणि सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
उच्च जोखीम असलेल्या अन्नपदार्थांवर विशेष नजर
भगर, वरीचे तांदूळ, शिंगाडा पीठ, साबुदाणा व राजगिरा यांसारखे उपवासाचे पदार्थ, दुग्धजन्य उत्पादने, मांस, पाणी, बर्फ, खाद्यतेल, सुका मेवा व बेसण, तसेच मिठाईवरील चांदीचा वर्ख आणि खाद्यरंगांच्या प्रमाणावरही काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, आयात अन्नपदार्थ आणि बेकरी उत्पादनांच्या तपासणीत कोणतीही हयगय केली जाणार नाही. सण संपल्यानंतर 14 दिवसांच्या आत दोषींवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.
चार टप्प्यांमध्ये कारवाई
- पहिला टप्पा (सणापूर्वी 15 ते 21 दिवस) – जोखमीची क्षेत्रे निश्चित करून तेथील गुप्त माहिती गोळा करणे. कारवाईसाठी पथक तयार करणे. रॅपिड टेस्ट कीटचा वापर करणे. नमुन्यांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळांना पूर्वसूचना देणे.
- दुसरा टप्पा (सणापूर्वी 1 ते 14 दिवस ) – खवा मंडया, गिरण्या, गोदामे, शीतगृहे येथील नमुने गोळा करणे. रात्रीच्या वेळी तसेच पहाटे नाकाबंदी करून तपासणी.
- तिसरा टप्पा (सणाच्या दिवशी) – मिठाईची दुकाने, बाजार, खाद्यगृहांवर नजर ठेवणे. अन्न नमुन्यांची भरारी पथकांमार्फत तपासणी करणे. ग्राहकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे.
- चौथा टप्पा (सणानंतर 30 दिवसांपर्यंत) – चाचणी अहवालांचा पाठपुरावा, जप्त मालाची विल्हेवाट, न्यायालयीन कार्यवाही, सणांतील कारवायांचा आढावा.
सण-उत्सवांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण
- राज्यव्यापी – गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि 31 डिसेंबर नववर्ष पूर्वसंध्या
- प्रादेशिक – संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी वारी, श्रावण, दहीहंडी, गुरुनानक जयंती
- स्थानिक – जत्रा, पालखी सोहळे, ऊरूस



























































