नागपूर आणि पनवेलमध्ये डीजेबंदी, डोळ्यांना इजा पोहचविणाऱ्या लेझर लाईटस्वरही निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात एकीकडे ‘डीजे’बंदीवरून गोंधळ सुरू असताना नागपूर आणि पनवेलमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मिरवणुकीत वापरल्या जाणाऱया डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर डोळय़ांना इजा पोहचविणाऱ्या बीम लाईट, लेझर लाईटवर नागपूर पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. पनवेल पोलिसांनीही गणेशोत्सवासाठी असाच निर्णय घेतला आहे.

राज्यात 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धूम सुरू होणार आहे. या काळात मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम होणार असल्याने ध्वनिवर्धक, डीजे, डॉल्बी आणि विविध प्रकाशयंत्रणांचा वापर वाढतो. त्यातून ध्वनिप्रदूषणाबरोबरच वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.  नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नागपूर शहरात 4 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे होणार आहेत. यामध्ये गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींच्या आगमन-विसर्जन मिरवणुका यांचा समावेश आहे.

नेमकी कशावर बंदी?

डीजे साऊंड, डॉल्बी साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा साऊंड, प्रेशर मिड सिस्टीम, मॉडिफाइड साऊंड सिस्टीम असलेली वाहने, डीजेची साऊंड सिस्टीम वाहून नेणारी वाहने, बीम लाईट, लेझर बीम लाईट, डिम लाईट.

आदेशात काय…

  • कानाचे पडदे फाडणाऱया डीजेच्या आवाजाने चिमुकली, वृद्ध मंडळी, रुग्ण यांना मोठा त्रास होतो.
  • बीम लाईट, लेझर बीम लाईटमुळे डोळय़ांना दुखापत होण्याचाही धोका असतो.
  • रस्त्याने जाणाऱया वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अनुचित प्रकार घडण्याची भीती असते.
  • 3 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून 1 नोव्हेंबर  रात्री 12 वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील.

आक्षेपार्ह देखावे नको

पनवेल शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक मंथन हॉल येथे घेण्यात आली. परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी डीजे, डॉल्बी तसेच लेझर लाईटचा वापर करू नये, अशी सूचना केली. आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत आणि महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र दर्शन रांगा कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.