महाप्रसाद, इफ्तार पार्टी, भंडारा आणि लंगरमधील अन्नाची गुणवत्ता FDAच्या रडारवर! आयोजकांना सूचना देत तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सध्या राज्यभरात FDA ची धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. सण-उत्सवांमध्ये भेसळीचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा महाप्रसाद, इफ्तार पार्टी, लंगर आणि भंडाऱ्याकडे वळवला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी सर्व आयोजकांना महत्त्वाच्या सूचना देत भेसळखोरांना कडक इशारा दिला आहे.

तुकाराम मुंढे म्हणाले, “सामूहिक अन्नवाटपाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सामूहिक अन्नवाटपामध्ये महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर किंवा भंडारा असेल, अशा स्थळांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अन्न सुरक्षा कायदा व त्याचे मानके यांचे पालन होत आहे का नाही, ही तपासणी करायची आहे. त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. अन्न शिजवणारा व पुरवणारा हे दोघेही केटरर या प्रकारात येतात. त्यामुळे या व्यवसाय प्रकाराखाली परवानाधारक असणं बंधनकारक आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही एक फॉरमॅट तयार केला आहे. त्या फॉरमॅटनुसार कमीत कमी सात दिवस आधी आमच्या स्थानिक अधिकाऱ्याला आयोजकांनी तशी माहिती द्यायाची. त्यानंतर आमचे अधिकारी तिथे जाऊन तपासणी करतील, असं तुकारा मुंढे म्हणाले.

त्याचबरोबर कारवाई कशापद्धतीने होणार, याची सुद्धा तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली आहे. एकूण चार टप्प्यांत धडक कारवाई केली जाणार आहे. ही चार टप्यांची प्रक्रिया सणाच्या 21 दिवस आधी सुरू होईल आणि सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहील.

  • पहिल्या टप्प्यात पूर्व तयारी करण्यात येईल यामध्ये हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना.
  • दुसऱ्या टप्यात नाका तपासणी करण्यात येईल यामध्ये गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष आणि पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी करण्यात येणार आहे.
  • तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष सणाचा दिवस, त्यामुळे या टप्प्यात विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली जाणार आहे.
  • चौथ्या टप्प्यांत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वरील तीन टप्प्यांमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर करणे.