डीजे विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला, पत्रकारांशी बोलत असताना घडली घटना  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल-ताशांच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने आवाज उठवत आहे. अनेकांना हा निर्णय मान्य नसून याच रागातून एका अज्ञात व्यक्तीकडून विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली असून बापट यांनी हल्लेखोराविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विद्यानंद बापट हे पुण्याच्या नारायण पेठेतील रहिवासी असून पर्यावरणाच्या प्रश्नांवर ते सातत्याने भूमिका मांडत आहेत. गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजाला त्यांनी यापूर्वीही विरोध केला होता. याच भूमिकेमुळे गणेश मंडळांचे प्रतिनिधी, डीजेप्रेमी तसेच काही ढोल पथकांतील व्यक्तींमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेतही बापट यांनी डीजेच्या वापराला विरोध केला होता. त्यावेळी गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि काही राजकीय व्यक्तींनी बापट यांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यावेळी देखील परिस्थितीचा अंदाज घेऊन पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बंदोबस्तात सभागृहाबाहेर काढले होते.

दरम्यान, गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना एका अज्ञात व्यक्तीने बापट यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना बापट यांनी हा हल्ला सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोप केला. घटनास्थळी असलेल्या व्हिडीओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. बापट म्हणाले की, “मी सशस्त्र नव्हतो आणि पोलीसही नव्हते, हे पाहून माझ्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ फुटेज आहे. पोलिसांनी ते पाहून कारवाई करावी. मारेकऱ्याला चौकीत घेऊन तुडवून काढा, त्याशिवाय त्याला सरळ भाषेत सांगून कळणार नाही, असे ते म्हणाले.

सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. मात्र, उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याची भूमिका विद्यानंद बापट यांनी पुन्हा मांडली.