अकरावी नंतर पुढे शिक्षण न घेतल्याची करिना कपूरला खंत, म्हणाली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिना कपूरने आपल्या शिक्षणाबाबत एक खंत व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या ध्येयाने तिने 11 वीनंतर शिक्षण पुढे सुरू ठेवले नाही. मात्र, आज मागे वळून पाहताना शिक्षण पूर्ण न केल्याची खंत मनात असल्याचे करिनाने सांगितले. पॉडकास्टर हनुमान दास यांच्याशी झालेल्या अलीकडील संवादात करिनाने तिच्या शिक्षण आणि अभिनयाच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले. ‘मी माझे शिक्षण कधीच पूर्ण केले नाही आणि ही गोष्ट कुठेतरी माझ्या मनात राहून गेली,’असेही तिने यावेळी म्हटले.

अभिनय क्षेत्रात येण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तिने शिक्षणाऐवजी चित्रपटांना प्राधान्य दिले. ‘मला अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करायचे होते. मला तेच करायचे होते आणि माझ्या मनाचे ऐकायचे होते,’ असे करिनाने सांगितले. शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत असल्याने करिना आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक आग्रही असल्याचेही सांगते. युनिसेफने हिंदुस्थानातील मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याबाबत तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी स्वतःचे शिक्षण पूर्ण न केल्याची खंत असल्याने हा विषय तिच्यासाठी विशेष महत्त्वाचा असल्याचे तिने सांगितले.

करिनाने मुंबईतील जमनाबाई नर्सी स्कूल आणि त्यानंतर डेहराडूनमधील वेलहॅम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये काही काळ वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. मात्र, तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही. याशिवाय करिनाने हार्वर्ड समर स्कूलमध्ये मायक्रो-कॉम्प्युटर्सशी संबंधित तीन महिन्यांचा समर कोर्स पूर्ण केला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला वकील होण्याचीही इच्छा होती.