
खोपोली शहरात उंच भागावर वसलेल्या काजूवाडीचा रस्ता डेंजर बनला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खचल्याने वाहने ४० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता खचल्याने नागरिकांना व शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
खोपोली पालिका क्षेत्रात उंच टेकडीवर काजूवाडी आहे. या ठिकाणीच पालिकेचं जलशुध्दीकरण केंद्र असल्याने वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मुसळधार पावसात रस्ता खचला असून मोठमोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. ३० ते ४० फूट उंची असलेल्या वळणावरील रस्ता खचल्याने वाहने चालविताना मोठी आडचण येत आहे. रस्त्यावर विद्युत खांबच नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे काजूवाडीत कोणतीही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका वरती येण्यास अडचण होऊ शकते. काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. रस्ता ठिकठिकाणी खचल्यामुळे गणरायाच्या मिरवणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार असून स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
पालिका प्रशासनाने कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर गणेश विसर्जन मिरवणूक कशी काढणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या चंदा पाटील यांनी केली आहे.




























































