
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर घेराव घातला. डॉ. रूपनवर यांचे पार्थिव मुंबईहून घेऊन आलेली रुग्णवाहिका त्याच ठिकाणी थांबून होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे लेखी आश्वासन आरोग्य विभागाने दिल्यानंतर पार्थिव अंत्यविधीसाठी
डॉक्टरांच्या गावाकडे रवाना झाले.
दरम्यान, सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. रूपनवर यांच्या पार्थिवावर माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार ऍड. आर. जी. रूपनवर, रामभाऊ सातपुते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. रूपनवर यांच्या मृत्यूमुळे भडकलेल्या वातावरणाची धग आजही कायम होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटणचे पोलीस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालयात तळ ठोकून बंदोबस्ताचे नियोजन केले होते. अपेक्षेप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी वाढत गेली आणि अवघ्या एका तासात रुग्णालयासमोर हजारो नागरिक जमा झाले. यादरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईहून डॉ. रूपनवर यांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका फलटणला उपजिल्हा रुग्णालयासमोर पोहोचली. त्यामुळे वातावरण आणखी धीरगंभीर आणि तणावपूर्ण झाले. याप्रकरणी निर्णायक काही घडल्याशिवाय मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
दुपारी तीनच्या सुमारास फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रूपनवर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्या जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. तथापि, मागण्या तातडीने मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा पवित्रा नागरिकांकडून घेण्यात आला.
‘एसआयटी’साठी अहवाल पाठवणार
या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही आजच पूर्ण केली जाईल, असे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनंतर आरोग्य विभागानेही प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी दूरध्वनीवरून डॉ. रूपनवर यांच्या पत्नीशी चर्चा करून कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि प्रकरणाची माहिती घेतली. तसेच कुटुंबीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी पत्राद्वारे केली आहे. आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी डॉ. रूपनवर यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून त्यांच्या मूळगावी फडतरी (मांडवी), ता. माळशिरस येथे अंत्यविधीसाठी करण्यात आले.



























































