Egypt Accident – सिनाईमध्ये प्रवासी बस उलटल्याने 16 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्तच्या पूर्व सिनाई द्वीपकल्पात बुधवारी प्रवासी बस उलटली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने घटनेची पुष्टी केली. मृत्यू झालेल्यांमध्ये जॉर्डनच्या 10 नागरिकांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण सिनाईच्या पूर्व किनारपट्टीवरील दाहब आणि नुवेइबा या लोकप्रिय पर्यटन शहरांदरम्यान हा अपघात घडला. बसमध्ये एकूण 43 प्रवासी होते. त्यापैकी 22 जण जॉर्डनचे नागरिक होते, असे तेथील सरकारी वाहिनीने नमूद केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. याबाबत तपास सुरू आहे.

हा परिसर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून तो येथील सागरी जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्वतीय हायकिंगसाठी ओळखला जातो.

इजिप्तमध्ये वाहन अपघात ही सामान्य बाब आहे. बेजबाबदारपणे वाहन चालवणे, वाहनांची देखभाल न करणे आणि कायद्याची अपुरी अंमलबजावणी ही याची मुख्य कारणे मानली जातात. इजिप्तच्या सरकारी सांख्यिकी संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशभरात रस्ते अपघातांमध्ये सुमारे 6000 लोकांचा मृत्यू झाला होता.