मध्य प्रदेशातील धबधब्याला भेट दिल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 मुलांचा मृत्यू; चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील शिवपुरी शहरातील एका धबधब्याला भेट दिल्यानंतर एकाच कुटुंबातील चार मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन सख्थे भाऊ आणि एक त्यांचा चुलत भाऊ यांचा समावेश आहे. धब्याधब्यावर अंघोळ करून आल्यानंतर अज्ञात आजारामुळे 10 दिवसांच्या कालावधीत चौघांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, धबधब्यावरून आल्यानंतर सुरुवातीला त्यांना ताप आला आणि त्यानंतर पोटदुखी, उलट्या व जुलाब असा त्रास सुरू झाला. यानंतर चौघांची प्रकृती वेगाने खालावली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी ही चारही मुले गोरा टीला जवळील एका धबधब्यावर गेली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि 21 ते 31 ऑगस्ट या कालावधीत त्या सर्वांचा मृत्यू झाला. ते पाणी दूषित असावे, असा संशय नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

माहिती गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या एका पथकाने मंगळवारी संबंधित कुटुंबाची भेट घेतली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्राथमिक तपासणीत संसर्गामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, असे जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय ऋषीश्वर यांनी सांगितले. अद्याप मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आलेले नाही आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.