
अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी टेनिस कोर्टवर दिग्गजांचा धडाका पाहायला मिळाला. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर एकेरीच्या कोर्टवर परतलेल्या कार्लोस अल्काराजने रोमन सफीउलिनचा सरळ तीन सेटमध्ये समाचार घेत विजयी सलामी दिली. दुसरीकडे तीन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या स्टॅन वावरिंकाचा प्रवास मात्र मॅटेओ बेरेटिनीविरुद्धच्या पराभवासह संपुष्टात आला. महिला विभागात इगा स्वियातेक, विद्यमान विजेती एरिना सबालेंका आणि दुखापतीनंतर पुनरागमन करणारी झेंग छिनवेन यांचादेखील अपेक्षेप्रमाणे विजयारंभ झाला.
चार महिन्यांनंतर एकेरीत पुनरागमन करणाऱ्या कार्लोस अल्काराजने सफीउलिनला 6-4, 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये नमवले. सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत स्पॅनिश स्टारने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. माजी यूएस ओपन विजेता स्टॅन वावरिंकाला बेरेटिनीने 7-6 (4), 7-6 (3), 6-0 असे पराभूत केले. या पराभवासह वावरिंकाचा ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीचा अखेरचा सामना ठरला. 2016 मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या वावरिंकाने 2026 हंगामानंतर व्यावसायिक टेनिसला अलविदा करण्याची घोषणा आधीच केली आहे.
शेल्टनचा पलटवार; सितसिपासची झुंजार बाजी
अमेरिकेच्या बेन शेल्टनने टॅलोन ग्रीक्सपूरविरुद्ध पहिला सेट 1-6 असा गमावला; मात्र त्यानंतर सलग तीन सेट जिंकत 1-6, 6-1, 7-6 (3), 6-2 अशी बाजी मारली. स्टेफानोस सितसिपासनेही जबरदस्त पुनरागमन केले. आर्थर फिल्सविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर आणि दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकने पिछाडीवर असतानाही सितसिपासने सामना 4-6, 7-6 (3), 6-1, 6-4 असा जिंकला.
स्वियातेकची सहज आगेकूच
महिला विभागात इगा स्वियातेकने वांग जियायूचा 6-2, 6-3 असा पराभव केला. मोठय़ा स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील हा तिचा सलग 28 वा विजय ठरला. विद्यमान विजेती आणि अव्वल मानांकित एरिना सबालेंकाने पॅमिला ओसोरियोला 6-2, 6-4 असे हरवत विजेतेपदाच्या बचावाची दमदार सुरुवात केली. सबालेंकाने 32 विनर्स लगावले. अमांडा अनिसिमोवा, पॅरोलिना मुचोव्हा आणि डायना श्नायडर यांनीही विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
झेंग छिनवेनचे दमदार कमबॅक
दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या झेंग छिनवेनला 16 वर्षीय क्वालिफायर क्रिस्टीना लिउतोव्हाने पहिल्या सेटमध्ये 6-4 असे नमवले, मात्र झेंगने त्यानंतर जोरदार कमबॅक करत पुढील दोन सेट 6-3, 6-1 असे जिंकले. पुनरागमनानंतरचा हा तिचा सलग चौथा विजय ठरला.





























































