
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसिला चॅन यांनी आयर्लंडमध्ये तब्बल 440 एकर परिसरात पसरलेली ऐतिहासिक ‘कॅसल इस्टेट’ खरेदी केली आहे. काउंटी वॉटरफोर्डमधील ‘स्ट्रँकली कॅसल’ आता झुकरबर्ग कुटुंबाच्या मालकीचे झाले आहे. आयर्लंडला भेट देताना झुकरबर्ग आणि त्यांचे कुटुंब या ऐतिहासिक वास्तूचा निवासासाठी वापर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या खासगी व्यवहाराची नेमकी किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ‘द आयरिश टाइम्स’च्या वृत्तानुसार, या भव्य मालमत्तेची किंमत अंदाजे 20 ते 30 दशलक्ष युरो म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे मानले जात आहे.
झुकरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांनी ही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती लंडनस्थित गुंतवणूक कंपनी आरएबी कॅपिटलचे सह-संस्थापक मायकल ॲलन-बकली आणि त्यांची पत्नी जियानकार्ला यांच्या मालकीची होती. या दाम्पत्याने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘स्ट्रँकली कॅसल’ खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या नूतनीकरणासह तिचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. मालमत्ता विकल्यानंतर त्यांनी तब्बल 25 वर्षे या ऐतिहासिक वास्तूचे मालक राहिल्याचा उल्लेख केला. कॅसलचे संरक्षण आणि नूतनीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, झुकरबर्ग कुटुंबही या मालमत्तेचे आणि आसपासच्या परिसराचे जतन पुढे सुरू ठेवणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
झुकरबर्ग यांच्या प्रवक्त्याने या खरेदीला दुजोरा दिला आहे. मार्क झुकरबर्ग आणि त्यांचे कुटुंब या ऐतिहासिक घराची देखभाल आणि जतन करण्याचे काम पुढेही सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. आयर्लंडमध्ये मेटाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असल्याने झुकरबर्ग यांचा या देशाशी व्यावसायिक संबंध आधीपासूनच आहे. आता या खरेदीमुळे आयर्लंडमधील त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतही मोठी भर पडली आहे.
वृत्तानुसार ‘स्ट्रँकली कॅसल’ सुमारे 1830 मध्ये जॉन केली यांच्यासाठी बांधण्यात आला होता. केली हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे माजी खासदार होते. प्रसिद्ध वास्तुविशारद जेम्स आणि जॉर्ज रिचर्ड पेन यांनी या वास्तूची रचना केली होती. काउंटी वॉटरफोर्डमधील ब्लॅकवॉटर व्हॅली परिसरात ही भव्य इस्टेट आहे. हा भाग ऐतिहासिक वास्तू, मोठ्या इस्टेट्स आणि आलिशान ग्रामीण घरांसाठी प्रसिद्ध आहे.



























































