
पावसाने जबरदस्त ओढ दिल्यामुळे राज्यात खरिपाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल आठ लाख हेक्टरची घट झाली आहे. ऑगस्टअखेर ९५ टक्के पेरणी झाली असून मराठवाड्यात खरिपाच्या पेरणी क्षेत्रात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसाच्या भरवशावर झालेली पेरणीही पाऊसच नसल्यामुळे संकटात सापडली आहे.
राज्यात ऑगस्टअखेर १.३६ कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मूग, तूर, मका, ज्वारी, हळद, बाजरी, उडदाची लागवड केली. मराठवाड्यात जवळपास ४८ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मात्र संपूर्ण ऑ गस्ट महिना कोरडा गेला. पावसाने ओढ दिल्यामुळे ही सगळी पेरणी संकटात सापडली आहे. सोयाबीन आणि कापसाची वाढ खुरटली आहे. मूग, उडीद, मकाही सुकला आहे. ज्वारी, बाजरीचेही असेच हाल आहेत. पावसाचा खंड पडल्यामुळे पेरणीत आठ लाख हेक्टरची घट झाली आहे. ऑगस्टअखेर पेरण्या संपतात, त्यामुळे या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाही.
राज्यात ऑगस्टअखेरपर्यंत १.३६ कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी हीच पेरणी १.४२ कोटी हेक्टर एवढी होती. एकूण पेरणी ९५ टक्के झाली असली तरी विभागनिहाय हे चित्र असमान आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अजूनही बऱ्याच जिल्हयात सरासरी ३० टक्के पेरणी शिल्लक आहे. मराठवाड्यात पाऊस न झाल्यास झालेली पेरणीही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
सप्टेंबरमध्येही पावसाची दांडी
सप्टेंबरमध्येही पाऊस दांडी मारणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या महिन्यात मराठवाड्यात ६९ टक्के पावसाची तूट आहे. अन्निनोचा हा प्रभाव असून सप्टेंबरमध्येही तो जाणवणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या कमी दाबाचा एक पट्टा तयार झाला असून त्यामुळे विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस पडण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मराठवाड्यातील खरीप पेरणी
छत्रपती संभाजीनगर – 93 टक्के
जालना – 90 टक्के
परभणी – 93 टक्के
नांदेड – 97 टक्के
हिंगोली – 81 टक्के
बीड – 92 टक्के
धाराशिव – 95 टक्के
लातूर – 94 टक्के































































