
कायद्यानुसार बालविवाहाला बंदी आहे, तरीदेखील काही ठिकाणी चोरी, छुपके अशा प्रकारचे विवाह लावले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कल्याणच्या मामणोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात येणार होता. पण चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांनी हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. मुलगी व मुलाच्या पालकांना समज देण्यात आली असून त्यांच्याकडून लेखी हमीपत्रही घेण्यात आले आहे.
मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी ३० ऑगस्ट रोजी बालविवाह होणार होता. याबाबत पुण्यातील चाईल्ड हेल्पलाईनच्या नियंत्रण कक्षाला तक्रार आली. माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक श्रद्धा नारकर यांनी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी उल्हासनगर येथील राहणारी असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे यांनी उल्हासनगर येथे कर्मचारी पाठवले. पोलिसांच्या मदतीने मुलीच्या घरच्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांच्या घरी चौकशी केली असता संबंधित कुटुंबीय गावाला गेल्याची माहिती मिळाली. ज्या मुलाबरोबर विवाह ठरलेला होता त्याच्या पालकांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
जन्मतारीख व आधारकार्ड तपासणी
अल्पवयीन मुलीच्या आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. आईला घटनास्थळी बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलीची जन्मतारीख व आधारकार्ड तपासणी केली असता मुलगी १६ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बालविकास विभाग आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या समन्वयातून ही कार्यवाही करण्यात आली.
पालकांच्या ताब्यात दिले
बालविवाहाचे गांभीर्य व त्याचे परिणाम मुलीच्या पालकांना समजावून सांगण्यात आले. तसेच बालविवाह होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. पालकांकडून हमीपत्र घेण्यात आले. त्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
इथे संपर्क साधा
बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






























































