
आदिवासींच्या नावाने विविध बँकांमध्ये खाते उघडून अनेकांना साडेतीन कोटींचा सायबर गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा गंडा घालणाऱ्या पेणच्या उंबर्डे गावातील भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर म्हात्रे असे त्याचे नाव आहे. स्थानिक आदिवासींना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याच खात्याचा या भामट्याने गैरवापर केला. या फसवणुकीमागे मोठे रॅकेट असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२५ वर्षीय मयूर म्हात्रे याने सागर वाघमारे व वामन गडखळ या दोन आदिवासींशी संपर्क साधला. तसेच त्यांना दरमहा पंधराशे रुपये व अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले. त्यांच्या नावाने बँकांमध्ये खातेदेखील उघडले. वाघमारे व गडखळ यांच्या माध्यमातून इतर अनेक आदिवासींची खाती वेगवेगळ्या बँकांमध्ये सुरू केली. त्यांनादेखील अशाच प्रकारची आमिषे दाखवण्यात आली. खाते आदिवासींचे व त्याची हाताळणी मात्र मयूर म्हात्रे हा भामटा करायचा.
दोघांना केले सहआरोपी
पेण पोलिसांनी या सायबर फ्रॉड करणाऱ्या भामट्याचा छडा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी दिली. या सायबर गुन्ह्यामध्ये सागर वाघमारे व वामन गडखळ यांनादेखील सहआरोपी करण्यात आले आहे. मयूर म्हात्रे याच्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
अशी केली फसवणूक
मयूर याने आदिवासींच्या बँक खात्यांचा गैरवापर करून रायगडातील अनेक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले. स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू देऊ, तुमचे खाते अपडेट केले नाही तर ते बंद होईल, तुम्ही लॉटरीमध्ये २५ लाख जिंकला आहात. बँकेचे डिटेल्स द्या, तुमच्या नावाने कुरिअर आले आहे… ओटीपी द्या, असे सांगून मयूर याने अनेक नागरिकांकडून ३ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये उकळले. नागरिकांचा विश्वास मिळवल्यानंतर तो आदिवासींच्या बँक खात्यांचे क्रमांक द्यायचा व त्यात पैसे पाठवायला सांगायचा. त्यानंतर आदिवासींच्या ओटीपी व अन्य कागदपत्रांच्या सहाय्याने परस्पर पैसे हडप करीत असे.





























































