
तुम्ही जर ठाणे पालिका मुख्यालयासमोरून जात असाल तर तुम्हाला खाली पाहण्याबरोबर वर पाहून चालावे लागणार आहे. नाही तर कधी कपाळमोक्ष होईल याचा नियम नाही. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या नारळाच्या झाडांवरील नारळ परिपक्व होऊन सुकले असल्याने खाली पडू लागले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना दुखापत होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे हे सुकलेले नारळ काढण्याची तसदी पालिका प्रशासन घेत नसल्याने ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे शहरात विविध रस्त्यांवर उंचच उंच नारळाची झाडे आहेत. या झाडांवरील नारळ परिपक्व होऊन सुकल्यानंतर खाली पडतात. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. नारळामुळे दुखापती झाल्याचे काही प्रकारही घडले आहेत. काही जण झाडावरून पडणारा नारळ डोक्यात पडता पडता वाचले आहेत. मुंबई शहरात झाडावरून पडणाऱ्या नारळामुळे नागरिक जखमी आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे प्रकार वाढल्यानंतर नारळाच्या झाडांना सेफ्टी नेट लावण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. मात्र ठाणे महापालिकेने झाडावरून पडणाऱ्या नारळापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
ठाणे महापालिका मुख्यालयात नागरिकांची दिवसभर जत्रेप्रमाणे गर्दी असते. मुख्यालयासमोरील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने वाहनांची बेकायदा पार्किंग केली जाते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना फूटपाथवरून चालावे लागते. याच फूटपाथवर झाडावरील नारळ नेम धरून पडत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात नारळाची अनेक उंचच उंच झाडे आहेत. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडांवरील नारळ परिपक्व होऊन सुकले आहेत. त्यामुळे या झाडांवरील नारळ आता मुख्य रस्त्यावर पडू लागले आहेत.





























































