
मुंबईकरांना नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. आखातात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद मुंबईकरांच्या खिशावर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नॅचरल गॅसचे दर भडकल्याने महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 2 रुपये प्रति किलो, तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सुधारित दर आज 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर 88 रुपये प्रति किलो, तर पीएनजीचा दर 53 रुपये प्रति एससीएम झाला आहे.
महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आखातातील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्थानात सीएनजीच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या स्पॉट रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसवर अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसचे भाव कडाडल्याने तसेच देशांतर्गत बाजारात सीएनजीची मागणी प्रचंड वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला.
दरम्यान, यापूर्वी मुंबईत रिक्षा भाडे 1 आणि टॅक्सी भाडे 2 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने देखील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 3.89 रुपयांची वाढ केली होती. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे ऐन सणासुदीच्या काळात इंधनाचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
STORY | Taxi, auto-rickshaw fares hiked in Mumbai region
Auto-rickshaw and black-and-yellow taxi fares in the Mumbai Metropolitan Region (MMR) were on Tuesday increased by Re 1 and Rs 2, respectively, officials said.
READ: https://t.co/d5as61nWIm pic.twitter.com/KMQwVzTZLk
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2026
43 लाख ग्राहकांना फटका
दरम्यान या दरवाढीमुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लातूर आणि धाराशिव या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि दावणगेरे येथील तब्बल 13 लाख सीएनजी वाहनधारकांना फटका बसणार आहे. याशिवाय, मुंबई आणि लगतच्या परिसरातील जवळपास 30 लाख घरगुती पीएनजी वापरणाऱ्या कुटुंबांचा स्वयंपाकाचा खर्च वाढणार आहे.
क्रूड ऑईल 91 डॉलर्सवर
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेल्या आगामी काळात तेलपूरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीनेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 91 डॉलर्सवर पोहोचले आहेत, तर डब्ल्यूटीआय क्रूड 86 डॉलर्स पार गेले आहे. सोमवारी तेलाच्या किमतीत 2.8 टक्क्यांची वाढ झाली.






























































