
मुलांच्या गटात मुंबईच्या देव रुपारेलियाने, तर मुलींच्या गटात दिल्लीच्या इशिता नेगी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज हिंदुस्थान कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात अव्वल मानांकित देव रुपारेलिया याने सोळाव्या मानांकित उत्तराखंडच्या निश्चल चंदचा 21-16, 21-16 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या अंतिम सामन्यात 17 वर्षीय दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या इशिता नेगीने महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीचा 21-19, 21-18 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 36 मिनिटे चालला. इशिता ही बारावीत वाणिज्य शाखेत शिकत आहे.



























































