
आपल्या साहित्यातून मांगेला-कोळी समाजाच्या दर्यावर्दी जीवनाचे प्रभावी चित्रण करणारे आणि या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे पंढरीनाथ तामोरे आज 1 सप्टेंबर रोजी 80 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा हा परिचय.
पालघर जिल्हय़ातील तारापूरनजीकच्या घिवली या समुद्रकिनाऱयालगत असलेल्या निसर्गरम्य परिसरातील गावात जन्मलेले साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे यांचा 80 वर्षांचा जीवनप्रवास पाहिला की थक्क व्हायला होते. लिखाणाप्रमाणेच अंगात असलेली प्रचंड ऊर्जा, उत्साह, चैतन्य, कोणत्याही कामात झोपून देण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
कष्टकरी मांगेला समाजात राहून त्यांनी साहित्याचार्य पदवी मिळवली हे त्यांचे खरे वैशिष्टय़. लिखाणात मराठी शब्दकळेवरील त्यांची हुकूमत ही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच निर्मळ आणि न निसटता येण्याजोगी, अनलंकृत मराठी भाषेचे सौंदर्य त्यांच्या कथांमधून पाहायला मिळते. ती भाषा साधी, सोपी, प्रवाही आणि अंतःकरणाला भिडणारी असते. पिढीजात चालत आलेला त्यांचा मासेमारीचा आणि मासेविक्रीचा व्यवसाय असला तरी शिक्षणाची, वाचनाची आवड असल्यामुळे गावातील ज्या शाळेत ते शिकले तिथली वाचनालये त्यांची खरे मित्र बनली.
घिवलीतील जीवन शिक्षण मंदिर प्रा. शाळा, तारापूर येथील रा. वि. सावे माध्यमिक विद्यालय, मुंबईचे रूपारेल महाविद्यालय येथे शिक्षण घेतल्यावर गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघात मराठी भाषा, साहित्य याचा समग्र अभ्यास कष्टपूर्वक करून लेखी-तोंडी परीक्षा देऊन त्यांनी साहित्याची ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी आपल्या कथालेखनाचा असा काही झपाटा सुरू केला की ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात दिल्ली दूरदर्शनने त्यांच्या ‘अजुनी बघते वाट’ या कथेची दखल घेऊन तिचे टीव्ही नाटय़ रूपांतर ‘प्रतीक्षा – एक कहानी’ 1987 मध्ये प्रक्षेपित केले.
कोळी समाजाच्या जीवनातील वादळवाऱयाचा संघर्ष ही मध्यवर्ती कल्पना असलेली ही कलापृती खूप गाजली. ज्या समाजात आपण वाढलो, प्रसिद्ध पावलो त्या मांगेला कोळी समाजाचे ऋण फेडण्याचा वसा त्यांनी घेतला. त्या समाजातील वास्तव समस्यांचा तसेच त्यांच्या उत्कर्षाचा विचार हा केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या कथालेखनाला प्रारंभ झाला. आतापर्यंत त्यांचे दीपस्तंभ, हिरवा कातळ, वारसा, तांडेल, प्रतीक्षा, साईसागर, घुमतोय वादळवारा, झुंज इत्यादी कथासंग्रह, सोनाली ही मांगेला भाषेतील कादंबरी, आश्चर्याचे प्रकाशदिवे, कोळी जीवनशैली, झंझावात हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय त्यांच्या ‘दर्याचा राजा’ या त्रैमासिकातून ते आपल्या समाजातील तसेच देशातील, राज्यातील कर्तबगार व्यक्तींविषयी लिहीत असतात. तसेच मराठीतील नामवंत साहित्यिकांचे साहित्यही प्रकाशित करीत असतात. तरीही त्यांची नाळ त्यांच्या मांगेला कोळी समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षाशीच जोडलेली असते.
कोकण, मुंबई किनाऱ्यापासून गुजरात, गोवा, दीव-दमणच्या किनाऱ्यापर्यंत हा समाज पसरलेला आहे. त्या समाजाच्या बोलीपासून त्यांच्या जीवनपद्धतीपर्यंत साऱ्याचा अभ्यास करून त्या समाजाची सर्व क्षेत्रांत प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न आणि मार्गदर्शन ते करीत असतात. बोलीभाषांच्या अस्तित्वामुळे आणि विकासामुळेच मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल, हा विचार त्यांनी वेळोवेळी ठासून मांडला.
मांगेला-कोळी बोलीवर त्यांनी खूप संशोधन केले. त्या बोलीला आपल्या स्वत्वाची जाणीव करून दिली. मराठी भाषा, वाङ्मय यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेले उपक्रम पाहिले की, मराठीवरील त्यांच्या निस्सीम प्रेमाची प्रचीती येते. आपल्या घिवली या जन्मगावी त्यांनी काही वर्षांपूर्वी भव्य साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यातून तळागाळापर्यंत साहित्याची चळवळ नेणे हा त्यांचा मोठा विचार अनुभवायला मिळाला. त्यानंतर रायगड, दापोली, मुंबई अशा अनेक ठिकाणी ‘कोमसाप’च्या सहकार्याने त्यांनी भव्य साहित्य संमेलने पार पाडली. मधु मंगेश कर्णिक हे तर त्यांचे आद्यगुरू. त्यांच्याबरोबरच अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर यांसारख्या कवीमित्रांनी ही संमेलने गाजवली.
पंढरीनाथ तामोरे हे गेली काही वर्षे दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष आहेत. मराठी साहित्यविषयक अनेक आदर्श उपक्रम ते तिथे वर्षभर राबवीत असतात. आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांची मने जिंकतात. या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाला अगणित शुभेच्छा!
श्रीकांत आंब्रे






























































