संस्कृतायन – सृष्टी आणि शब्दसृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

शतकानुशतके भारतीय रसिकांना मोहवणाऱया महाकवी कालिदासाचे सर्वश्रेष्ठ महाकाव्य म्हणजे ‘रघुवंश’. एका संपूर्ण राजवंशाचा प्रदीर्घ इतिहास कालिदासाने या काव्यात उभा केला आहे. रघुवंशावरील दीर्घ मालिकेतील हा पहिला लेख.

कालिदासाची महती आपण सारेच जाणतो. कालिदास हा खऱया अर्थाने भारताचा राष्ट्रीय कवी म्हणता येईल. त्याच्या साहित्यात भारतीय निसर्ग, संस्कृती, जीवनमूल्ये आणि मानवी भावभावनांचे अत्यंत समृद्ध चित्र उमटले आहे. भारतीयत्वाशी घट्ट नाते राखूनही त्याच्या काव्यातील मानवी अनुभव वैश्विक आहेत. म्हणूनच शतकानुशतके भारतीय रसिकांना मोहवणारा कालिदास भारताच्या सीमा ओलांडून जागतिक साहित्यविश्वातही श्रेष्ठ कवी म्हणून गौरवला गेला आहे.

आतापर्यंत आपण कालिदासाच्या अनेक साहित्यकृतींचा परिचय करून घेतला आहे. आपण मेघदूतातील महत्त्वाच्या रमणीय स्थळांचाही आस्वाद घेतला. त्याआधीही कालिदासाविषयी आपण अनेकदा बोललो आहोत. कुमारसंभवाचाही परिचय आपण करून घेतला आहे, पण अनेकांनी अशी इच्छा व्यक्त केली की, कालिदासाचं सर्वश्रेष्ठ महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणाऱया रघुवंशाचा सविस्तर परिचय या सदरातून करून देण्यात यावा.

संस्कृत साहित्यामध्ये एक प्रसिद्ध उक्ती आहे – ‘क इह रघुकारे न रमते?’ कालिदासाने नाटकं, महाकाव्यं, खंडकाव्यं अशा विविध साहित्य प्रकारांत अजरामर कलाकृती निर्माण केल्या. तरीही संस्कृत साहित्यविश्वाने त्याला दिलेली एक विशेष ओळख आहे – ‘रघुकार’, म्हणजे रघुवंशाचा कर्ता. रघुवंश या कलाकृतीचा हा केवढा मोठा गौरव आहे!

रघुवंश हे केवळ एका राजाची कथा सांगणारं महाकाव्य नाही. एका संपूर्ण राजवंशाचा प्रदीर्घ इतिहास कालिदासाने या काव्यात उभा केला आहे. एकोणीस सर्गांमध्ये विस्तारलेल्या या महाकाव्यात दिलीपपासून अग्निवर्णपर्यंत एकूण एकोणतीस रघुवंशीय राजांचा वंशक्रम आपल्यासमोर येतो. अर्थात या सर्वच राजांची चरित्रं कालिदासाने सारख्या विस्ताराने रंगवलेली नाहीत. काही राजांच्या कथा सविस्तर येतात, तर काहींचा उल्लेख अत्यंत संक्षेपाने केला आहे.

या वंशातील एक अत्यंत पराक्रमी आणि श्रेष्ठ राजा म्हणजे रघू. दिलीपचा पुत्र असलेल्या रघूने आपल्या कर्तृत्वाने अशी कीर्ती संपादन केली की, पुढे हा संपूर्ण वंशच त्याच्या नावाने – रघुवंश – ओळखला जाऊ लागला. म्हणूनच प्रभू श्रीरामांनाही आपण ‘राघव’ म्हणतो. तेही याच रघुवंशाचे वारस आहेत. रघुवंशाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे या महाकाव्यामध्ये रामकथाही समाविष्ट झाली आहे, पण रघुवंश केवळ राजांच्या कथा किंवा पराक्रमांची मालिका नाही. या एकोणीस सर्गांमधून कालिदास जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतो. तत्त्वज्ञान, नीती, राजधर्म, राज्यकारभार, प्रजेविषयी राजाची जबाबदारी, त्याग, प्रेम, कर्तव्य – मानवी आणि सामाजिक जीवनाच्या अशा अनेक पैलूंचं अत्यंत प्रभावी चित्रण या काव्यात दिसतं.

विशेषत ‘राजा कसा असावा?’ याचा एक आदर्श या महाकाव्यातून सतत आपल्यासमोर उभा राहताना दिसतो. दिलीपपासून अग्निवर्णपर्यंतचा हा प्रवास म्हणजे केवळ एका राजवंशाचा इतिहास नाही; तो राजधर्म, मानवी मूल्यं, उत्कर्ष आणि अधपतन यांचाही प्रवास आहे आणि हाच सगळा प्रवास या मालिकेतून तुमच्यासमोर उलगडण्याचा आपला प्रयत्न आहे. कालिदासाची या महाकाव्याची प्रस्तावनाच इतकी सुंदर आहे की, तिथेच आपलं मन बराच काळ रमतं. काव्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याची परंपरा संस्कृत साहित्यामध्ये आहेच, पण कालिदासाने रघुवंशाच्या आरंभी लिहिलेला मंगलाचरणाचा श्लोक इतका विलक्षण आहे की, या एका श्लोकानेच जणू त्याने एक मानदंड निर्माण केला आहे.

वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगत पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ?

कालिदास शिवभक्त असावा, असं वाटायला लावणारे अनेक संदर्भ त्याच्या साहित्यात सापडतात. शिवाचं अत्यंत सुंदर आणि भव्य वर्णन त्याने अनेक ठिकाणी केलेलं दिसतं, पण रघुवंशाच्या या पहिल्याच श्लोकात शिव-पार्वतीचं जे अद्वैत कालिदासाने उभं केलं आहे, ते विलक्षण आहे. ‘उपमा कालिदासस्य’ – असं जे म्हटलं जातं, त्याची प्रचीती जणू पहिल्याच श्लोकात येते. कालिदास म्हणतो, वाणी आणि तिचा अर्थ जसे एकमेकांशी संलग्न आहेत. अगदी त्याचप्रमाणे पार्वती आणि परमेश्वर एकमेकांशी! शब्दापासून त्याचा अर्थ वेगळा करता येत नाही आणि अर्थाला अभिव्यक्त होण्यासाठी शब्दाची आवश्यकता असते. दोघांच्या मिलनातूनच अर्थपूर्ण वाणी जन्माला येते. त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती ही दोन स्वतंत्र तत्त्वं नसून परस्परांशी अभिन्नपणे जोडलेली आहेत. त्यांच्या संयोगातूनच सृष्टीच्या निर्मितीची कल्पना भारतीय तत्त्वज्ञानाने मांडली आहे. त्यामुळे या उपमेला आणखी एक सुंदर अर्थ प्राप्त होतो. एका बाजूला शब्द आणि अर्थ यांच्या संयोगातून निर्माण होणारी काव्यसृष्टी आणि दुसऱया बाजूला शिव व शक्ती यांच्या संयोगातून निर्माण होणारी विश्वसृष्टी. ही काव्यसृष्टी समजून घेण्यासाठी जगाच्या माता-पित्यांना कालिदासाने वंदन केले आहे.

म्हणजे रघुवंशाची सुरुवात केवळ एका पारंपरिक मंगलाचरणाने होत नाही. ज्या कवीचं संपूर्ण विश्वच शब्द आणि अर्थ यांच्यावर उभं आहे, तो कवी आपल्या महाकाव्याच्या पहिल्याच श्लोकात शब्द व अर्थ यांच्या अभिन्न नात्याला विश्वाच्या माता-पित्यांच्या अभिन्नत्वाची उपमा देतो आणि म्हणूनच रघुवंशाचा हा पहिला श्लोक संस्कृत साहित्यातील सर्वाधिक स्मरणीय मंगलाचरणांपैकी एक ठरतो. पुढील लेखात याच प्रस्तावनेतून विनम्र स्वभावाच्या कालिदासाची भेट घेऊ.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]