
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे संक्रमण शिबिरातील रहिवाशांपाठोपाठ आता दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त (सेस) इमारतींमधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी म्हाडा दोन कंपन्यांची नेमणूक करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईत सध्या १२ हजार ५०० उपकरप्राप्त इमारती असून त्या ८० ते १०० वर्षे जुन्या आहेत. या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. आता या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. याबाबत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आला तरच मूळ भाडेकरू आणि रहिवाशांची माहिती मिळत होती. बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळे मूळ रहिवाशी किंवा भाडेकरू किती आहेत, याचा अचूक डेटा म्हाडाकडे जमा होईल. सर्वेक्षणाच्या कामासाठी एजन्सी नेमण्यासाठी म्हाडाने निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी चार कंपन्यांचे प्रस्ताव आले होते. त्यांपैकी पात्र ठरलेल्या दोन कंपन्यांची नियुक्ती केली जाईल.
जीआयएस मॅपिंग आणि घराच्या क्षेत्रफळाची नोंद होणार
-
सर्वेक्षण करण्याआधी कार्यकारी अभियंत्यांमार्फत रहिवाशांना नोटीस देऊन सर्वेक्षणाबाबत सूचना दिली जाईल. सर्वेक्षणाच्या वेळी भाडेकरू किंवा रहिवाशी असल्याचे पुरावे आणि ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.
-
बायोमेट्रिक सर्वेक्षणासोबतच घराचे क्षेत्रफळ आणि जीआयएस (GIS) मॅपिंगदेखील केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी या कंपनीकडूनच सॉफ्टवेअर विकसित केले जाईल. कंपन्यांना जेवढ्या इमारतींचे सर्वेक्षण होईल त्यानुसार मोबदला दिला जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वीही म्हाडाकडून सर्वेक्षणाचा प्रयत्न
म्हाडाने गेल्या वर्षीदेखील उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, इमारत मालक आणि भाडेकरू यांनी विरोध केल्यामुळे ते सर्वेक्षण अर्धवट सोडावे लागले होते. त्यामुळे रखडलेले बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा मार्गी लावण्याच्या म्हाडाच्या या प्रयत्नाला रहिवाशी किती प्रतिसाद देतात, हे लवकरच स्पष्ट होईल.


























































