287 हिंदुस्थानी नागरिक अद्याप बेपत्ता, 88 नागरिकांची सुखरूप सुटका, हिंदुस्थानी वंशाच्या 128 लोकांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या महापुरात आतापर्यंत 669 जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजारांहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. यात 287 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. 400 हिंदुस्थानी नागरिक तिबेटमध्ये अडकले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी यासंबंधी माहिती दिली आहे.

नेपाळच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची डीएनए चाचणीत मदत करण्यासाठी सहा हिंदुस्थानी फॉरेन्सिक पथके काठमांडूमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत 88 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यात आली असून 287 हिंदुस्थानी नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. रसुवा येथील जलविद्युत प्रकल्पातून चार हिंदुस्थानी नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. हे सर्वजण लवकरच काठमांडूला पोहोचणार आहेत. सुटका झालेल्यांमध्ये रिपू कुमार, चन्नेश्वर नरजरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन अशी यांची नावे आहेत. नेपाळमधील विनाशकारी पुराचा देशाच्या जलविद्युत उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली खोऱयांमधील चौदा जलविद्युत प्रकल्पांना फटका बसला आहे, ज्यात सहा बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.

नेपाळचे लष्कर ठरतेय देवदूत!

नेपाळमधील महापुरानंतरची दृश्ये काळीज पिळवटून टाकणारी आहेत. गावेच्या गावे चिखल आणि मातीखाली गडप झाली आहेत. बेपत्ता नागरिकांचे कुटुंबीय आपल्या माणसांसाठी आशा लावून बसले आहेत. या कुटुंबीयांसाठी नेपाळी लष्कराचे जवान देवदूत बनून काम करत आहेत. आतापर्यंत लष्कराने 900हून अधिक लोकांची सुखरूप सुटका केली आहे. लोकांचे जीव वाचवतानाच पुरात उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा सावरण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मलबा खणून घरे मोकळी केली जात आहेत. टिकाव, फावडी घेऊन लष्कराचे जवान अहोरात्र राबत आहेत.