
रायगड जिल्ह्यात यावर्षी तब्बल ८ हजार ८७० दहीहंड्यांचा थरथराट पाहायला मिळणार आहे. यामध्ये १ हजार ९५६ सार्वजनिक तर ६ हजार ९१४ खाजगी दहीहंड्यांचा समावेश असून लाखो रुपयांच्या बक्षिसांचे लोणी मटकावण्यासाठी गोविंदा पथकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय नेत्यांनी पुरस्कृत केलेल्या सुमारे ३२ दहीहंड्यांमध्ये सर्वाधिक बक्षीसे असणार आहेत.
दहीहंडी उत्सवाला धार्मिक परंपरेसोबतच आता सामाजिक आणि मनोरंजनात्मक स्वरूपही प्राप्त झाले आहे. आता शहरापासून ग्रामीण भागातही चौकाचौकांत लाखो रुपयांच्या दहीहंडी उभारल्या जात आहेत. आयोजकांकडून मोठमोठ्या मंडपांची उभारणी, विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आणि ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. दरम्यान उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाकडूनही गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
महिला गोविंदा पथकांचा वाढता सहभाग
महिलाही आता उत्साहाने दहीहंडीच्या मैदानात उतरत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हून अधिक महिला गोविंदा पथके सक्रिय असून या पथकांकडूनही नियमित सराव सुरू आहे. महिला पथकांकडून थर रचण्याबरोबरच दहीहंडी फोडण्याच्या कौशल्यावर विशेष भर दिला जात आहे. महिलांचा वाढता सहभाग हा उत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचे चित्र असून यामुळे दहीहंडी उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.



























































