भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमास हिंदू संघटनांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान मोहन भागवत हे न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनीच विरोध केला आहे. आरएसएस आणि त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आमचे अजिबात प्रतिनिधित्व करत नाही, असे म्हणत या संघटनांनी कार्यक्रमाला विरोध करणारे खुले पत्र लिहिले आहे. त्यावर 61 आंतरधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱया केल्या आहेत.

संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोहन भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱयावर आहेत. सध्या ते न्यूयॉर्क येथे असून शनिवारी ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात मोहन भागवत सहभागी होणार आहेत. मात्र सुरुवातीपासून हा कार्यक्रम वादात अडकला आहे.

न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली होती. तर हा एक खाजगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार स्थानिक प्रशासनाकडे बहुदा नाहीत, असे ममदानी यांनी सांगितले.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

मोहन भागवत यांची उपस्थिती असलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी 61 संघटनांनी केली आहे. यासंदर्भात हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या संघटनेच्या कार्यकारी संचालक सुनिता विश्वनाथ म्हणाल्या की, आरएसएस आणि त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आमचे अजिबात प्रतिनिधित्व करत नाही हा स्पष्ट संदेश देण्यासाठी आमचे अनेक समर्थक या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून विरोध नोंदवतील.