
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ५ वर्षीय विधी (एलएलबी ५ वर्षे) अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची (CAP) दुसरी यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत ११ हजार ५२१ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ८१४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ८ हजार ७७३ जागा उपलब्ध होत्या.
या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या पहिल्या फेरीत आजपर्यंत एकूण २ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. यामध्ये ‘कॅप’मधील (CAP) २ हजार ६३६ विद्यार्थी व २११ विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) या प्रवर्गातील आहेत. दुसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान त्या महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून, आवश्यक कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे, असे सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


























































