
हिंदुस्थानातील तरुणांनी शस्त्र उगारून कायदा हातात घेऊ नये. या कृतीने कोणाला तरी गंभीर दुखापत होऊ शकते याचे भान तरुणांनी ठेवायला हवे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका तरुणावरील गुन्हा रद्द केला.
घरावर चालून आलेल्या जमावाला तलवार उगारून धमकावल्याचा या तरुणावर आरोप होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने याचिका केली होती. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला. मात्र, या तरुणाने तलवार उगारून हवेत फिरवली. त्याचे हे वर्तन बघता या देशातील अन्य तरुणांनी असे कृत्य करू नये असा संदेश जनमानसात जायला हवा, त्यासाठी या तरुणाला दहा हजारांचा दंडही ठोठावला जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
सराईत गुन्हेगार नाही
हा तरुण सराईत गुन्हेगार नाही. घटनेच्या दिवशी कौटुंबिक वादातून त्याच्या घरावर जमाव आला होता. स्वरक्षणासाठी त्याने तलवार उगारली. ही तलवार त्याला खेळातील उत्तम कामगिरीसाठी बक्षीस म्हणून मिळाली होती. तलवार उगारण्यामागे त्याचा कोणताही गुन्हेगारी हेतू अथवा कट नव्हता. त्यामुळे त्याला आता सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. त्याला आता नोकरीची संधी मिळाली आहे, त्यात अडथळा येऊ नये यासाठी हा गुन्हा रद्द केला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही
या तरुणाला खटल्याला सामोरे जावे लागले किंवा तुरुंगात खितपत राहावे लागले, तर त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. अशा परिस्थितीत तो गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याऐवजी त्याला मुख्य प्रवाहात आणून चांगला माणूस बनण्याची संधी द्यायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.


























































