
पालिकेने ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण मुंबईतील १३४ पदपथ अतिक्रमणमुक्त केले आहेत. या कारवाईमुळे १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ मोकळे झाले आहेत. एकट्या भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेले हे अभियान कठोरपणे राबवले जात आहे.
पालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानात पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २०० पदपथांपैकी १३४ पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. भांडुपमध्ये केलेल्या कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार तसेच ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ‘एस’ विभागाकडून ‘पादचारी प्रथम’ अभियानासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईतील व्यावसायिक आणि नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२०० पदपथ करणार मोकळे
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. त्यापैकी १३४ पदपथांचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून १४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व २६ विभागांत हे अभियान राबवले जात आहे.


























































