कल्याणमध्ये तर्रट टँकरचालकाचा धुमाकूळ; पाच वाहनांना धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणच्या रामबाग स्टेशन रोड परिसरात आज संध्याकाळी मद्यधुंद टँकरचालकाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. या भरधाव टँकरने दोन रिक्षांसह तब्बल चार ते पाच दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने अनेक पादचारी थोडक्यात बचावले.

सोनीकुमार गुल्लू असे मद्यधुंद टँकरचालकाचे नाव असून हा टँकर साईबाबा वॉटर सप्लायर कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण रामबाग क्रमांक 3, आंबेडकर रोड, ताल हॉटेल ते पुष्पराज हॉटेल या मार्गावर चालकाने पाण्याच्या टँकर बेफामपणे चालवला. यावेळी त्याने रस्त्यावरील दोन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत पाच नागरिक जखमी झाले. मद्यधुंद टँकरचालकाने घातलेल्या या धुमाकूळाचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टँकर रस्त्यावरून भरधाव जात असताना वाहनांना धडक देत असल्याचे दृश्य या फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून हे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.