हिंदुस्थानात एकही मुसलमान नको म्हणणारा हिंदू असूच शकत नाही; आपल्या DNA मध्ये एकता-विविधता! – मोहन भागवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातून मुसलमानांना हाकलून दिले पाहिजे, अशी विचारसरणी ठेवणारी कोणतीही व्यक्ती हिंदू असूच शकत नाही, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित फेथ लिडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. हिंदू धर्मातील मानवतेच्या आणि एकात्मतेच्या तत्त्वज्ञानात अशा प्रकारच्या बहिष्काराला अजिबात स्थान नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

माझ्या व्याख्यानमालेदरम्यान काही मुस्लिम बांधवांनी मला विचारले होते की, हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत मुस्लिमांना बाहेर काढले जाईल का? त्यावर मी स्पष्ट केले होते की, ते हिंदुत्व नाही. जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की हिंदुस्थानात एकही मुस्लिम नको, तर तो हिंदू उरणारच नाही. स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात आणि प्रत्येक मनुष्याला प्रतिष्ठा आहे, हे मानावेच लागेल, असे 2018 मधील आपल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत मोहन भागवत म्हणाले.

राजकारण हा आता स्वार्थाचा खेळ झाला

सामाजिक आणि धार्मिक संघटनांना सार्वजनिक धोरण आणि राजकारणावर प्रभाव पाडायचा असतो, परंतु या कामाची सुरुवात समाजातूनच व्हावी लागते, असेही मोहन भागवत म्हणाले. राजकारण हा आता स्वार्थाचा खेळ झाला आहे. जिथे मी आणि माझे येते, तिथे प्रश्नांवर तोडगा निघत नाही. आम्ही आणि आमचे, यातच खरे गमक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

आपल्या DNA मध्ये एकता-विविधता

विविधतेत एकता ही हिंदुस्थानची पारंपरिक विचारसरणी आहे आणि देश वेळोवेळी संपूर्ण जगाला याची जाणीव करून देत आलो आहोत. एकता आणि विविधता हिंदुस्थानच्या डीएनएमध्ये आहे. लोक वेगवेगळे दिसतात, त्यांच्या राहण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण सर्वांमध्ये एक नैसर्गिक संबंध आहे, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.