पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलणार, नीलेकणी टास्क फोर्सने मागवल्या जनतेकडून सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षेआधी पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सहा सदस्यीय उच्चाधिकार टास्क फोर्सने सार्वजनिक परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांची तयारी केली आहे. सध्याची परीक्षा व्यवस्था बदलण्यासाठी नीलकणी टास्क फोर्सने जनतेकडून 30 सप्टेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि नागरिक संघटनाकडूनही मते मागवण्यात आली आहे.

इन्पहसिस सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील ही टास्क फोर्स विशेषतः एनटीएच्या परीक्षांचे संचालन, सुरक्षा, परीक्षा रचना आणि व्यवस्थेतील सुधारणांवर काम करत आहे. टास्क फोर्सचे उद्दिष्ट परीक्षा व्यवस्था सुरक्षित, पारदर्शक, निष्पक्ष आणि भविष्यासाठी तयार करणे हे आहे. यात परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखणे, संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी करणे यांसारख्या मुद्दय़ांवर सूचना मागवण्यात येत आहेत.

या मुद्द्यांवर मागवल्या सूचना

पेपरफुटीच्या त्रुटी कशा टाळाव्यात आणि ओळखाव्यात. परीक्षेची रचना आणि मूल्यमापन कसे सुधारावे. परीक्षा घेणाऱया संस्थांची जबाबदारी कशी ठरवावी. संगणक आधारित परीक्षेत सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, परीक्षा केंद्र उमेदवारांनुसार सुविधा कशा वाढवाव्यात. पारदर्शकता वाढवण्याचे आणि तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्याचे मार्ग कोणते असावे, अशा सूचना मागवल्या आहेत.