
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून डंपरमधील फिरते तलाव सोसायट्यांच्या दारात नेऊन विसर्जनासाठी मूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या बाप्पाची ‘निरोपाची पूजा आणि आरती’ करून आपली मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या ताब्यात देता येणार आहे. या ठिकाणीच मूर्तीचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, तर सव्वा दोन लाख घरांमध्ये घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. या मूर्ती विसर्जनासाठी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने नैसर्गिक स्रोतांवर आणल्या जातात. यामुळे भाविकांचीही गैरसोय होते आणि नियोजन करताना पालिकेची तारांबळ उडते. त्यामुळे आता डंपरमधील कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये पालिकेचे कर्मचारी सोसायटीच्या दारात येऊन विसर्जनासाठी मूर्ती स्वीकारणार आहेत.
या वर्षी ३५० कृत्रिम तलाव
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने मुंबईभरात गेल्या वर्षी २२८ कृत्रिम तलाव निर्माण केले होते. यावर्षी यामध्ये वाढ करून तब्बल ३५० कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी भाविकांना पालिकेच्या ‘माय बीएमसी’ (MyBMC) या ॲपवर घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. यानंतर पालिकेकडून संबंधितांना विसर्जनासाठी वेळ दिली जाईल. यामुळे विसर्जन विनाअडथळा पार पडणार असल्याचे उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.


























































