
राज्यातील पाचशेहून अधिक शासकीय धान्य गोदामांमधील धान्याची थेट वाहतूक करण्याचा निर्णय मागे घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने न पाळल्यामुळे सप्टेंबर महिन्यात पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शासकीय धान्य गोदाम हमाल माथाडी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दिला आहे.
या आंदोलनाची दिशा, स्वरूप आणि पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता हमाल भवन, गुलटेकडी, मार्पेट यार्ड, पुणे येथे संयुक्त कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शासकीय धान्य गोदामांमधील हमाल माथाडी यांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यापूर्वी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून 25 व 26 मे रोजी राज्यभर काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी 26 मे रोजी हमाल माथाडी यांना बेरोजगार होऊ दिले जाणार, तसेच माथाडी मंडळाने निश्चित केलेल्या दरानुसार हमालांना मजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र बैठकीला तीन महिने उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस आदेश निघालेला नाही.


























































