
>> गणेश पुराणिक
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानचे पथक सज्ज झाले आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत असून, यंदा टेबल टेनिस संघाकडून हिंदुस्थानला मोठ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर याच्यासोबत नंबर-3 वर पोहोचलेल्या मनुष शहा याने ‘दैनिक सामना’शी संवाद साधला. यावेळी त्याने अल्टिमेट टेबल टेनिसमधील प्रवास, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
पुरुष दुहेरीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणे किती खास आहे?
मानव आणि मी गेल्या 12 वर्षांपासून सोबत खेळतोय. तो उजव्या हाताने आणि मी डाव्या हाताने खेळणारा खेळाडू आहे, जे दुहेरीसाठी सर्वोत्तम संयोजन मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी केल्यामुळे आणि एकमेकांच्या खेळाची अचूक समज असल्यामुळे आम्ही जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकलो.
आशियाई खेळांमध्ये बलाढ्य संघांचे आव्हान असेल, त्याकडे कसे पाहतो?
वर्षभरात आशियाई खेळांसारख्या खूप कमी स्पर्धा असतात. त्यामुळे आशियाई खेळांच्या आधी यूटीटी होणे ही आमच्यासाठी तयारीची उत्तम संधी होती. आमचा संघ तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. आशियाई खेळात तीन प्रकारांत पदकाचे दावेदार असण्यासोबतच आमचे मुख्य ध्येय लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणे हेच आहे.
सराव पद्धतीत कोणता बदल केला?
मी चेक प्रजासत्ताकमध्ये माझ्या चिनी प्रशिक्षकांसोबत सरावावर भर दिला. त्यांनी माझ्या फूटवर्क आणि बॅकहँडवर काम केले. पूर्वी प्रतिस्पर्धी मला फक्त फोरहँड खेळाडू मानत, पण बॅकहँड मजबूत झाल्यामुळे माझा खेळ अधिक संतुलित झाला. याच बदलामुळे माझ्या रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली.
मानवसोबतची 12 वर्षांची पार्टनरशिप किती खास आहे?
रणनीती ठरवताना, डावपेच आखताना आम्हा दोघांना समान भाषेमुळे अडचण येत नाही. समोरच्या संघाला आमचे डावपेच कळत नाही. असा अतिरिक्त फायदा आम्हाला मिळतो. तसेच वैयक्तिक पातळीवर स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि मानसिक रिकव्हरीसाठी मी पुरेशी झोप घेण्यावर भर देतो.
‘यू मुम्बा’सोबत विजेतेपद टिकवताना या मोसमात दबावाचा सामना कसा केला?
‘यू मुम्बा’सोबत हे माझे पहिलेच वर्ष होते आणि आम्ही विजेतेपद टिकवू शकलो याचा आनंद आहे. बंगळुरुविरुद्धचा अटीतटीचा सामना आणि युपीविरुद्ध 13-2 असा मिळालेला विजय, यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. कर्णधार म्हणून प्रत्येक खेळाडूने जबाबदारी घेतलेली पाहून खूप आनंद झाला. सेमीफायनल आणि फायनलमध्ये एकेरी आणि मिश्र दुहेरीत संघासाठी योगदान देता आले, ज्यामुळे आम्ही विजेतेपद कायम राखले.
तरुण खेळाडूंना काय सल्ला देशील?
फक्त निकालाच्या मागे धावलात तर प्रक्रियेपासून भटकून जाल. प्रक्रियेत धैर्य आणि सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या तीव्रतेने काम करत आहात, ते टिकवून ठेवा. योग्य प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले की निकाल आपोआप मिळतील. प्रक्रिया हाच यशाचा मार्ग आहे.
























































