Manipur Violence – मणिपूरमध्ये दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील विविध भागांमध्ये गोळीबार, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आता नोणे जिल्ह्यात शनिवारी दोन सशस्त्र गट आमनेसामने आले. यावेळी झालेल्या भीषण गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेलियांगराँग युनायटेड फ्रंट-कमसन आणि झेलियांगराँग युनायटेड फ्रंट-जेनचुई या दोन सशस्त्र गटांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार झाला. शनिवारी पहाटे हे दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार धुमश्चक्री उडाली. यात जांगाईलिंग गॉनमेई (वय – 37, रा. मणिपूर) या तरुणाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या सहा जणांपैकी पाच जणांना इंफाळ येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर एका जखमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या साडे तीन वर्षांपासून मणिपूर धुसमूसत आहे. मैतेई आणि कुकी समुदायामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू झाला आणि या हिंसाचाराच आतापर्यंत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर 50 हजारांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. 2026 मध्येही विविध भागांमध्ये हिसाचाराच्या अनेक घटना घडल्या असून यात 20 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरच्या कांगपोकपीमध्ये बंडखोरांकडून वाहनावर हल्ला; चार नागा नागरिकांचा मृत्यू, एक जण बेपत्ता