देवेंद्र फडणवीस लोकांचे नव्हे, तर बिल्डरांचे नेते; संजय राऊत यांचा खोचक टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर त्यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटबाबत विचारले असता, त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपण ट्विटद्वारे जे विचारले आहे ते अगदी खरे असून देवेंद्र फडणवीस यांना ईडी आणि इतर तपास यंत्रणांशी संबंधित गोष्टींची अधिक माहिती असते. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व बिल्डर त्यांना चांगले माहित आहेत. फडणवीस हे सर्वसामान्य जनतेचे नेते नसून, केवळ उद्योगपती आणि बिल्डरांचेच नेते असल्याचा घणाघाती आरोपही संजय राऊत यांनी केला. पुढे ते म्हणाले की, सध्या कोणता बिल्डर अडचणीत आहे किंवा कोणावर काय संकट आले आहे, याची खडान् खडा माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असू शकते. त्यामुळे त्यांनी ही माहिती स्वतःपुरती सीमित न ठेवता सर्वसामान्य जनतेलाही उपलब्ध करून द्यावी, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हिंदुस्थानात एक आणि परदेशात वेगळं हा दुटप्पीपणा, हे ढोंग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे आयोजित ‘फेथ लिडर्स कॉन्फरन्स’मध्ये एक विधान केले होते. “हिंदुस्थानात एकही मुसलमान नको असे म्हणणारा व्यक्ती हिंदू असूच शकत नाही, कारण आपल्या डीएनएमध्येच एकता आणि विविधता समाविष्ट आहे,” त्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भागवत यांनी ही विधाने अमेरिकेत जाऊन करण्यापेक्षा हिंदुस्थानात, दिल्लीत आणि नागपुरात राहून करायला हवीत. हिंदुस्थानात एक भूमिका घ्यायची आणि परदेशात जाऊन दुसरीच विधानं करायची, हा दुटप्पीपणा असून ते निव्वळ ढोंग आहे. आपल्या हिंदू धर्मात अशा प्रकारच्या ढोंगाला अजिबात स्थान नाही. या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जे लोक देशात विद्वेषाचे राजकारण करत आहेत, त्यांच्या पाठीशी संघ उभा राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरसंघचालकांनी घेतली पाहिजे. तसेच, जे लोक संघातून आलेले स्वयंसेवक आहेत आणि सध्या सरकारमध्ये बसून असे राजकारण करत आहेत, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याची मोहीम राबवू, अशा प्रकारची भूमिका सरसंघचालकांनी घेतली पाहिजे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही

खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर संजय राऊत म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची शक्यता नसल्याचे मी पूर्वीपासून वारंवार सांगत आलो आहे. मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही, मात्र राजकारणातील घडामोडी आणि अंतर्गत परिस्थिती मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत हे विलीनीकरण शक्य नाही. शरद पवार हे या देशातले राजकारणातले टोलेजंग व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी राजकारणातले अनेक टॉवर्स उभे केले आणि पाडलेत. आज त्यांचे वय आणि प्रकृती पूर्णपणे साथ देत नसली, तरीही ते शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या हाताखाली काम करायचे का, असा साधा प्रश्न आहे.  जी लोकं सध्या विलीनीकरणाच्या गप्पा मारत आहेत, त्यांना वास्तव माहीत नाही. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर हा विलीनीकरणाचा विषय मुळातच संपलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पक्षाने नेमके कोणाच्या पक्षात विलीन व्हायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. जिथे आहोत तिथे स्वाभिमानाने आणि प्रतिष्ठेने राहायचे की कुठेही वाहत जायचे. म्हणजे त्यांच्या पक्षात सुद्धा असे शहाणे लोकं आहेत. नुकतेच जयंत पाटील यांचे भाषण ऐकले असेल तर राजकारणात आणि जीवनात निष्ठा, श्रद्धा आणि स्थैर्य या गोष्टींना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे स्पष्ट होते, असेही संजय राऊत यांनी आवर्जून नमूद केले.

नेपाळला मदत करुन पुन्हा उभं करणं हे मोठा भाऊ म्हणून हिंदुस्थानचे कर्तव्य

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून, शेजारील देशाला तातडीने मानवीय मदत पुरवावी आणि तिथे अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २८ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, नेपाळला निश्चितच मदत केली पाहिजे. एकेकाळी ते हिंदुराष्ट्र होते आणि आजही आपण नेपाळकडे एक हिंदुराष्ट्र म्हणूनच पाहतो. हिंदुस्थान आणि नेपाळमध्ये अत्यंत घट्ट भावनिक संबंध आहेत. आपली सीतामाई नेपाळमधूनच हिंदुस्थानात आली आहे, त्यामुळे प्रभू श्रीराम आणि नेपाळचे एक अनन्यसाधारण भावनिक नाते आहे, असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, अनेक नेपाळी लोकं हजारो, लाखोंच्या संख्येने हिंदुस्थाना आपल्या बरोबर काम करतात. सैन्यात नेपाळी रेजिमेंट म्हणजेच प्रसिद्ध गुरखा रेजिमेंट कार्यरत आहे आणि तसेच दरवर्षी हिंदुस्थानातील हजारो नागरिक तीर्थयात्रेसाठी, कैलास मानस सरोवर यात्रेसाठी आणि पर्यटनासाठी नेपाळमध्ये जात असतात. त्यामुळे नेपाळला मदत करुन पुन्हा उभं करणं हे मोठा भाऊ म्हणून हिंदुस्थानाचं कर्तव्य आहे. आणि केंद्र सरकार जर या प्रकारची मदत करत असेल, तर आम्ही त्यांच्या या भूमिकेचे मनापासून कौतुक करतो, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.