
परभणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा घेऊ नका, अन्यथा कार्यकर्त्यांना घेऊन येईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांना दिला आहे. संजय शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी संजय जाधव यांना सुनावले.
मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत 11वे उपोषण सुरू केले असून रविवारी त्यांनी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना इशारा दिला. शिंदेंच्या उपस्थितीत होणारा परभणीतील कार्यक्रम घेऊ नका. त्यांना मराठ्यांच्या उरावर नाचायला आणू नका. तुमच्या समाज महत्त्वाचा आहे की नेता? कार्यक्रम रद्द केला नाही तर कार्यकर्त्यांना घेऊन येईल. तुम्हाला गोंधळ घालायचा आहे का? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
संजय शिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केले आहेत. तुम्ही हा कार्यक्रम थांबवा. जोपर्यंत रद्द केलेले प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेंनी येऊ नये. तुम्हाला मोठे करण्यासाठी समाजाने खूप मेहनत घेतली आहे. नाईलाजाने मी तिथे आलो तर शिंदेंची माघारी जायची पंचायत होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. तुमच्यामुळे राज्य अस्थिर होईल, त्यामुळे कार्यक्रम रद्द करा, असे ते म्हणाले.
जात पडताळणी समित्याच रद्द करा; मनोज जरांगेंची मागणी, मराठा आरक्षणासाठी 11 वे उपोषण सुरू
शेतकऱ्यांचे वाटोळे केले आणि आता मेळावे घेत आहेत. शिरसाटांनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि शिंदे आमच्या छाताडावर नाचायला कशाला आणता. मोठ-मोठे इथे झिरो झाले आहेत. कार्यक्रम घ्यायचा नाही. मराठ्यांच्या उरावर नाचून हा कार्यक्रम घेतला तर गोंधळ होईल. बंडू जाधव तुझे राजकीय करियर खराब होईल. दादागिरी करून कार्यक्रम घेतला, तर शिंदे, शिरसाट आणि बंडू जाधव यांनी राज्यात सुनियोजित पद्धतीने दंगल घडवून आणण्यासाठी कार्यक्रम घेतल्याचे सिद्ध होईल, असेही मनोज जरांगे म्हणाले.
कार्यक्रम रद्द होणार नाही – संजय जाधव
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर संजय जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यक्रम नियोजित असून लोक आले आहेत. त्यामुळे कार्यक्रम अचानक रद्द करता येणार नाही, असे बंडू जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले. यानंतर बंडू जाधव यांनी एसपींचीही भेट घेतली.
























































