
गेल्या अनेक वर्षात विविध सरकारांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली. मात्र, यातील बहुतांश प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. या घोषणांची आणि रखडलेल्या विकासकामांची वस्तुस्थिती मराठवाड्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात येत आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ‘डेव्हलपमेंट डिलेड… डेव्हलपमेंट डिनाइड’ या विषयावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे मराठवाड्याचा विकास आणि आजही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध प्रकल्पांवर सादरीकरण करणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लागावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते. मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. निधीची घोषणा केली जाते, परंतु पुरेसा निधी मिळत नाही. प्रकल्पांची घोषणा केली जाते, मात्र ते कागदावरच राहतात ही वस्तुस्थिती शिवसेना नेते आदित्य ठाकरे मांडणार असून मराठवाड्याच्या अनुशेषावरही प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.


























































