ते माझे आदर्श आहेत… शाहरुख खानसोबत काम करताना अभय वर्मा झाला भावुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अभय वर्मा सध्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव हा त्याच्यासाठी स्वप्नवत असल्याचे अभयने सांगितले.

अभयने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखसोबत काम करताना मिळणाऱ्या शिकवणीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. शाहरुखचा चाहता म्हणून तो मोठा झाला असून, त्यांच्याकडून केवळ अभिनयच नव्हे, तर आयुष्य जगण्याची पद्धतही शिकायची असल्याचे त्याने सांगितले. अभय म्हणाला, “मी हे शब्दांत मांडू शकणार नाही. कारण मी त्यांना पाहूनच स्वप्नं पाहायला शिकलो आहे. अनेकांना शाहरुखसारखा अभिनेता व्हायचं असतं; पण मला त्यांच्यासारखी व्यक्ती बनायचं आहे. शेवटी तेच सर्वात महत्त्वाचं आहे.”

आपल्या प्रत्येक भूमिकेमागे चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न असल्याचेही त्याने सांगितले. “माझ्यासाठी चांगली व्यक्ती बनणे आणि त्यानंतर शक्य असल्यास चांगला अभिनेता बनणे हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे अभयने स्पष्ट केले. ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खानला पहिल्यांदा भेटल्याचा अनुभवही अभयने सांगितला. शाहरुख आपल्या स्टारडमची जाणीव समोरच्या व्यक्तीला होऊ देत नाहीत, असे त्याचे म्हणणे आहे. अभयच्या मते, पहिल्या दिवशी शाहरुखसोबत काही तास घालवल्यानंतर घरी जाताना त्याला अचानक जाणीव झाली की, आपण ज्या व्यक्तीला आयुष्यभर आदर्श मानले, त्याच्यासोबत आपण काम करत आहोत.

शाहरुखचा प्रभाव केवळ अभिनयापुरता मर्यादित नसल्याचे अभयने सांगितले. अभयच्या शब्दांत, शाहरुख खान हे त्याच्यासाठी केवळ सुपरस्टार नाहीत, तर आयुष्यभराचे आदर्श आहेत. “आज कोणी माझं कौतुक केलं, तर मला वाटतं ते अप्रत्यक्षपणे शाहरुख सरांचंही कौतुक आहे. त्यांच्याकडून मी सर्व काही शिकलो आहे,” असे अभयने म्हटले.