
तिबेटमध्ये ग्लेशियर फुटल्यानंतर चीन-नेपाळ सीमा परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. पूर आणि ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 359 मृतदेह सापडले आहेत. या पुरामध्ये 1 हजार 300 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये 30 हून अधिक देशांतील विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत आठ जिल्ह्यांतून 359 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये रसुवा येथून 17, नुवाकोट 28, धादिंग 33, चितवन 132, गोरखा 30, तनहुँ 22, नवलपरासी पूर्व 82 आणि नवलपरासी पश्चिम येथून 15 मृतदेह सापडले आहेत.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, 517 विदेशी पर्यटकांचा अद्याप शोध लागलेला नाही. यातील अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी किंवा धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी नेपाळमध्ये आले होते. अमेरिकेचे 65, मलेशियाचे 51, युक्रेनचे 53, ऑस्ट्रेलियाचे 35, ब्रिटनचे 33 आणि कॅनडाचे 25 नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिंगापूरचे 8, जर्मनीचे 8 आणि रशियाचे 8 पर्यटक बेपत्ता आहेत. दक्षिण आफ्रिकेचे 6, लात्वियाचे 6 आणि जपानचे 5 नागरिकही अद्याप संपर्काबाहेर आहेत असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
चीनच्या ग्यिरोंग काउंटीमध्येही मोठी हानी झाली असून किमान तीन जणांचा मृत्यू आणि 558 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. नेपाळमध्ये सुमारे 100 चिनी नागरिक बेपत्ता असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. नेपाळमध्ये लष्कर, पोलिस आणि विविध बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, खराब हवामान, दुर्गम डोंगराळ भाग आणि वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. नेपाळ आणि चीनच्या यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.



























































