नेपाळमध्ये हिंदुस्थानी पर्यटक बेपत्ता; महाराष्ट्र, तामिळनाडूसह 4 राज्ये ॲक्शन मोडमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे अनेक हिंदुस्थानी पर्यटक आणि यात्रेकरू अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ सरकारकडून केंद्र सरकार, भारतीय राजनैतिक अधिकारी आणि नेपाळमधील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या यात्रेकरूंमध्ये तामिळनाडूतील नागरिकांची संख्या मोठी आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील 106 जणांनी मानसरोवर यात्रा केली होती, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ए. राजमोहन यांनी विधानसभेत दिली.

यापैकी 57 जण ‘सुपर यात्रा कुंभकोणम’ या संस्थेच्या गटासोबत गेले होते, तर 49 जण चेन्नईस्थित ‘महादेव कैलास यात्रा’ या टूर ऑपरेटरमार्फत प्रवासाला गेले होते. आतापर्यंत 20 यात्रेकरूंची सुटका करण्यात आली असून ते तिमुरे येथील आर्म्ड पोलीस फोर्सच्या छावणीत सुरक्षित आहेत. उर्वरित यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतर 49 जणांचे ठिकाण शोधण्याचे कामही सुरू आहे. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. कुटुंबीयांना माहिती मिळावी यासाठी तामिळनाडू सरकारने नवी दिल्ली येथे 24 तास नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील सुमारे 80 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नागरिकांची यादी अद्याप पडताळली जात असल्याने अंतिम आकडा बदलू शकतो. राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, यापैकी 57 जणांनी टूर एजन्सीमार्फत नेपाळचा प्रवास केला होता, तर काही नागरिक स्वतंत्रपणे गेले होते. आतापर्यंत महाराष्ट्रातील चार नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. 57 पर्यटकांच्या सहलीचे आयोजन करणाऱ्या ‘रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूम-इमर्जन्सी रिस्पॉन्स विभागाशी राज्याचे अधिकारी समन्वय साधत आहेत.

केरळमधील सुमारे 53 नागरिक नेपाळमध्ये अडकले असण्याचा अंदाज ‘नोर्का रूट्स’ने व्यक्त केला आहे. या नागरिकांचे संपर्क क्रमांक अधिकाऱ्यांकडे आहेत. मात्र, नेपाळमधील नेटवर्क समस्यांमुळे त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्या शेवटच्या ज्ञात ठिकाणांची माहिती तपासून हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे नागरिक सुरक्षित असण्याची शक्यता आहे, मात्र त्यांच्याशी थेट संपर्क होणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, नेपाळमधील बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून, हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेपाळमधील यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहेत.