
गोष्ट ‘आभाळमाये’चीच, पण थोडी गंमतीची. म्हणजे असं नाव की, जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतींनी, आकाशातील ताऱ्यांचे विविध ‘आकार’ ठरवले. त्यांना परिचयासाठी, त्यांच्या त्यांच्या संस्कृतीप्रमाणे नावे दिली. तिथल्या लोककथांमधे ती रुजली. वास्तविक एखाद्या तारकासमूहाला वेगळे नाव दिले तरी त्याचा आकार तोच राहातो आणि तो निराळ्या पद्धतीने ‘दाखवताही’ येतो. आपण ज्यांना नक्षत्र आणि राशी म्हणतो, त्यांचे ‘आकार’ कधी अगदी हुबेहूब तर कधी थोडय़ाफार प्रमाणात तसे दिसतात. मात्र, अशा एखाद्या तारकासमूहामधले सर्व तारे एकाच प्रतलावर नसतात. इतकेच नव्हे तर त्यांचे स्वरूप आणि वैश्विक रचनाही वेगळी असू शकते. एका ‘मृग’ नक्षत्रातच ताऱ्यांचा जन्म होणारा तेजोमेघ, एक मृत्युपंथाला लागलेला ‘लाल’ तारा आणि कोणी द्वैती किंवा ‘जोडतारे’सुद्धा असू शकतात. हरिणाच्या आकारात आपण ते पिढ्यानपिढ्या दाखवत आलो; परंतु याच तारकासमूहाला ग्रीक लोक बरोबर ‘शिकाऱ्या’चा आकार देऊन दाखवतात! पावसाळी वातावरणात उसळणाऱ्या ढगांचे आकार अनेकांना वेगवेगळे भासू शकतात. तसेच फरक इतकाच की, ते लाखो वर्षे तसेच राहाणारे असतात. ढगांसारखे क्षणात विरणारे नसतात.
जसे मृगनक्षत्राचे एक चित्रमय दर्शन, तसेच वृश्चिक राशीचेसुद्धा आपण त्या राशीला यथायोग्य भासणारा विंचवाचा आकार दिलाय, पण अवकाशातला आपला ‘तात्या’ विंचू जावा बेटावरच्या लोकांना मात्र कल्पवृक्ष असणाऱ्या नारळाच्या झाडासारखा वाटला. त्यात आजच योगायोगाने नारळीपौर्णिमा. तेव्हा वृश्चिक राशीचाच आकार ‘माडा’सारखा कसा ते आधी पाहू आणि मग या सुंदर तारकासमूहाबद्दल माहिती घेऊ.
एकूण तारकासमूहांच्या नकाशात कुठेही वृश्चिक राशीचा आकार ‘पाम ट्री’ किंवा नारळाच्या आकाराचा दाखवला जात नाही. इंडोनेशियातील जावा बेटावरचे लोक मात्र तो तसाच मानतात. मृगनक्षत्र आपल्याकडेही खेडय़ात काही ठिकाणी ‘खाटलं’ किंवा ‘बाजलं’ या आकारात दाखवतात. तसेच वाकलेल्या नारळाच्या झाडाला ‘जावा’ लोकांच्या भाषेत ‘कलापा डोयॉन्ग’ म्हटले जाते. याचा अर्थ नारळाचे कलते झाड.
आपण आणि पाश्चात्य देशांतल्या प्राचीन खगोल अभ्यासकांनी वृश्चिक राशीला (तारकासमूहाला) विंचवाचीच उपमा दिली. तर तीन ताऱ्यांची आडवी रेष आणि ती खाली वाढत जाऊन विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा आकार निरभ्र रात्रीच्या आकाशात नजरेत भरतो. राशीचक्रातील ही आठवी राशी किंवा रास, तर पाश्चात्य तारका नकाशातला हा महत्त्वाचा समूह. त्याचे वैज्ञानिक स्वरूप मनोरंजक आहे.
गेल्या चाळीस वर्षांत हा वृश्चिक किंवा ‘विंचू’ आम्ही खगोल मंडळींनी प्रत्येक वेळी नव्या उत्सुकतेने पाहिलाय. रोजचा उगवता सूर्य पाहावा तसा. ‘तारांगण’ पुस्तकात प्रदीप नायक सांगतात त्यानुसार, ‘वृश्चिक’ तारकासमूहाने आकाशाचा सुमारे 497 चौरस अंश भाग व्यापलेला आहे. पृथ्वीच्या गतीमुळे सूर्यभ्रमणाचे आयनिक वृत्त सरकते. परिणामी सध्या सूर्य वृश्चिकेतून फारच कमी मार्ग या तारकासमूहातून जातो. महाराष्ट्रातून आपल्याला ‘वृश्चिका’चे ठळक दर्शन मार्च-एप्रिल महिन्यांत पहाटे दोन ते साडेपाचपर्यंत चांगले होते.
या तारकासमूहातला ‘अल्प’ तारा म्हणजे ‘ज्येष्ठा.’ याला आपल्या सत्तावीस नक्षत्रात स्वतंत्र स्थान आहे. हा ‘अॅन्टॅरेस’ तारा लाल रंगाचा म्हणजे मृत्युपंथाला लागलेला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठाबरोबरच, अनुराधा आणि मूळ या नक्षत्रांचाही वृश्चिकेत समावेश होतो. त्यांचा क्रम ‘अनुराधा-ज्येष्ठा-मूळ’असा असून, ‘अनुराधा’ नक्षत्रात सरळ रेषेतील चार तारे, ज्येष्ठातील तीन तारे आणि मूळ नक्षत्राचे अकरा तारे मानले जातात. यातील लाल ठळक तो ‘अॅन्टॅरेस.’
या अॅन्टॅरेसचा क्रमांक अवकाशातील वीस तेजस्वी ताऱयांच्या यादीत पंधरावा लागतो. तो आपल्यापासून सुमारे 600 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या 15 पट असून आकार सूर्याच्या 700 पट आहे! त्याचा व्यास 97 कोटी किलोमीटर असून ‘ज्येष्ठा’ सूर्याच्या जागी आणला तर ‘मंगळा’पर्यंतचे ग्रह ‘खाऊन’ टाकेल. वृश्चिक तारकासमूहात द्वैती (जोडतारे) आणि चार ताऱ्यांचे ’चतुष्क’ही दिसते. छोटय़ा दुर्बिणीतूनही हे तारे वेगळे दिसतात.
वृश्चिक राशीतील नांगीजवळ ‘बटरफ्लाय’ नावाचा पंख पसरलेल्या फुलपाखरासारखा सुंदर तारकागुच्छ आहे. त्यामधे आणखी बंदिस्त तसेच खुले तारकागुच्छही आढळतात. मग वृश्चिकेला विंचू’ म्हणा की ‘माडाचे झुकते झाड.’ विज्ञानात काहीच बदल होत नाही.































































