
ज्येष्ठ बॉलिवूड दिग्दर्शक कुकू कोहली यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. 25 ऑगस्ट रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विशेषतः अभिनेता अजय देवगण याच्यासाठी कुकू कोहली यांचे निधन अत्यंत भावनिक धक्का देणारे ठरले आहे. कारण कुकू कोहली यांनीच ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अजय देवगणला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते.
कुकू कोहली यांच्या निधनानंतर अजय देवगणने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमधून अजयने आपल्या कारकिर्दीत कुकू कोहली यांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.
Some people change the course of your life forever. Kuku ji was one of those people for me.
Forever grateful for the faith you had in me. You will be deeply missed, Kuku ji.
Om Shanti.🙏— Ajay Devgn (@ajaydevgn) August 26, 2026
अजयने लिहिले, “काही माणसे तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. कुकूजी माझ्यासाठी अशाच व्यक्तींपैकी एक होते.” कुकू कोहली यांनी अजय देवगणवर दाखवलेल्या विश्वासाची आठवणही अभिनेत्याने या पोस्टमधून केली. ‘फूल और कांटे’ हा अजयच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे तो हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता बनला. अजय देवगणसाठी कुकू कोहली हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर त्याच्या कारकिर्दीवर विश्वास ठेवणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने अजय भावुक झाल्याचे त्याच्या पोस्टमधून स्पष्ट झाले.




























































