भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात महापौरांचे गुजरातीतून स्वागत, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने खडसावताच सूत्रसंचालक ताळ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमात भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांचे स्वागत सूत्रसंचालकांनी गुजरातीतून करताच मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात उभे राहून आवाज उठवला. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. महापौर मीरा-भाईंदरच्या आहेत, मग गुजरातीतून त्यांचे स्वागत काय करता. मराठीतून बोला, अशा शब्दांत या कार्यकर्त्यांनी सुनावताच सूत्रसंचालक ताळ्यावर आले आणि त्यांनी आम्ही महापौरांचे स्वागत करतो, असे मराठीत सांगितले.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक व अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदर येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात अमली पदार्थविरोधी मोहीम आणि सायबर गुन्ह्यांविरोधात वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाने जनजागृती करण्यासाठी ऑपरेशन निर्मूलन या कार्यक्रमाचे आयोजन केल `होते. या कार्यक्रमात महापौर डिंपल मेहता यांचे व्यासपीठावर आगमन झाले तेव्हा सूत्रसंचाल काने त्यांचे गजरातीतन स्वागत केले. याला मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून आक्षेप घेतला. मराठीतून बोला. हा महाराष्ट्र आहे. महापौरही भाईंदरच्या आहेत, मग गुजरातीतून त्यांचे स्वागत कशासाठी? मराठीतून स्वागत करा, अशा शब्दांत या कार्यकर्त्यांनी आयोजक आणि सूत्रसंचालकाला खडसावून सांगितले. त्यावेळी सूत्रसंचालकांनी महापौरांचे स्वागत आहे, असे मराठीतून सांगितले. शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमात मराठी भाषेचा मान राखला गेलाच पाहिजे, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीचे प्रतीक सर्वे, दीपेश सरोदे व प्रमोद पार्टे यांनी मांडली.