
महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 14 ते 15 वर्षे वयोगटांतील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेला अहिल्यानगर जिह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत जिह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 36 हजार 772 मुलींच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ सुमारे 3 हजार 500 मुलींचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे अवघ्या 9.50 टक्के उद्दिष्टाची पूर्तता झाली असून, मोहिमेचे अंतिम तीन महिने शिल्लक असताना ऑक्टोबरअखेर उर्वरित 33 हजारांहून अधिक मुलींचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर आजार असून, तो प्रामुख्याने उच्च जोखमीच्या मानवी पॅपिलोमा विषाणूच्या (HPV) संसर्गामुळे होतो. या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी योग्य वयात लसीकरण करणे महत्त्वाचे मानले जाते. याच उद्देशाने राज्य शासनाने 9 मार्चपासून 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जिह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, लसीबाबत असलेले गैरसमज, अपुरी जनजागृती आणि पालकांकडून मिळणारा कमी प्रतिसाद यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार अकोले तालुक्यात 138, जामखेड 343, कोपरगाव 239, कर्जत 144, नगर 239, नेवासा 177, पारनेर 271, पाथर्डी 138, राहाता 143, राहुरी 167, संगमनेर 306, शेवगाव 166, श्रीगोंदा 117, श्रीरामपूर 418 आणि मनपा क्षेत्रात 172 मुलींचे ‘एचपीव्ही’ लसीकरण झाले आहे. जिह्यात एकूण 3 हजार 330 मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याने आरोग्य विभागासमोर निर्माण झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 मधील आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे एक लाख 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळतात, तर सुमारे 80 हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. जगभरातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱया मृत्यूंपैकी सुमारे 25 टक्के मृत्यू भारतात होतात. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरणासोबतच नियमित तपासणी आणि जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा प्रतिबंध करता येणारा आहे. योग्य वयात ‘एचपीव्ही’ लस दिल्यास या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱया प्रमुख प्रकारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. त्यामुळे लसीबाबत गैरसमजांना बळी न पडता पालकांनी मुलींचे लसीकरण करून घ्यावे. – डॉ. सतीश सोनवणे, कॅन्सरतज्ञ






























































