
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, थकीत वीज बिले माफ करण्यात आल्याने दिलेला शब्द राज्य सरकारने पूर्ण केला. सध्या 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. भविष्यात शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देण्याचा व शे्तकऱयांची 58 हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱयांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत 12.5 लाख शेतकऱयांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. 56 लाख शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. दर 15 दिवसांनी नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते आहे.’
‘आमच्या पाठीशी सनातन व आध्यात्मिक शक्ती उभी असल्याने आम्हाला राज्यात विजय मिळाला,’ असा दावा करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘संतांच्या विचारांवर आघात करणाऱया किंवा त्यांना धमक्या देणाऱयांची गय केली जाणार नाही. जर कोणी धमकी देण्याचे कृत्य केले, तर त्याला थेट नेस्तनाबूत करून टाकू. कोणाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला.
सदगुरू योगिराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘सरला बेटावर समाजाला विचार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील मीपणा दूर होतो आणि जातिभेद विसरून सर्वजण एकत्र येतात.’
राजकीय नेत्यांचे हातात हात
– ‘सोनियाचा दिन आज उगवला’ या अभंगाच्या तालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महंत रामगिरी महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. तर, रामगिरी महाराज यांनी फडणवीस, शिंदे, विखे व थोरात यांचे एकत्रित हातात हात घालून गोल रिंगण करून व्यासपीठावर ठेका धरल्याने ‘भविष्यात या सर्व नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करावे,’ असा संदेश रामगिरी महाराजांनी दिल्याची चर्चा रंगली होती.
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
– ‘तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून, सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जाकेंद्र असेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरला बेट विकास आराखडय़ाच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यांसह विविध कामे सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.































































