
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, इराण सध्या भीषण आर्थिक आणि मानवतावादी संकटाचा सामना करत आहे. इराण आपल्या लष्कराच्या मोठ्या भागाला पगार देण्यास असमर्थ ठरला असून, तिथे आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जात असल्याचा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेकडून ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्टद्वारे इराणवर आर्थिक निर्बंध आणखी कडक करण्यात येत असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत असे म्हणाले आहेत. “इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक अपयशी ठरत आहे. ते आपल्या लष्कराच्या मोठ्या वर्गाला पगार देऊ शकत नाहीत आणि त्याच वेळी आंदोलकांची हत्या करत आहेत. अगदी जे लोक आंदोलन करत नाहीत, त्यांनाही मारले जात आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “हे एका भयानक प्रमाणावरील मानवतावादी संकट असून ते आताच थांबवले पाहिजे.” असे असले तरी लष्कराचे पगार आणि हत्यांबाबतच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ ट्रम्प यांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही.



























































