Jammu Kashmir – पुलवामात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन जणांना अटक, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांकडून एक पिस्तूल, 12 जिवंत काडतुसे आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. पुलवामा पोलीस, लष्कराची 44 वी राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि सीआरपीएफच्या 183 व्या बटालियनच्या संयुक्त पथकाने राजपोरा येथील सीबी नाथ गावाच्या यारवान वनक्षेत्रात ही मोहीम राबवली.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी संशयास्पद परिस्थितीत जंगलातून सीबी नाथ गावाकडे जाणाऱ्या दोन व्यक्तींना अडवले. लतीफ अहमद दिदार आणि एजाज अहमद बाजाद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता एक पिस्तूल, 12 पिस्तुलाच्या काडतुसे आणि एक हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. दोघांचीही चौकशी सुरू आहे. परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.