
टीम इंडियाचा फलंदाज यशस्वी जैसवाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात दुसऱया कसोटीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोघांवरही कारवाई केली आहे. दोघांच्या सामन्याच्या मानधनातून प्रत्येकी 25 टक्के रक्कम कापण्यात आली असून त्यांच्या शिस्तभंगाच्या खात्यात प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे.
जैसवालला बाद केल्यानंतर हे दोघे आमने-सामने आले. दोघांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या दिशेने जाऊन भिडले. या प्रकाराची आयसीसीने गंभीर दखल घेतली. दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली असून, आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सांगितलेली शिक्षा त्यांनी स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
मर्यादा ओलांडाल तर उत्तर मिळेल – जैसवाल
मैदानावरील वादानंतर जैसवालने सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली. फर्नांडोने नेमके काय म्हटले हे जाणून न घेता कोणालाही निकाल देऊ नये, असे त्याने म्हटले. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या क्रिकबझवरील व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना जैसवालने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ‘कोणी मर्यादा ओलांडली तर त्याला ते सांगावेच लागेल. हा हिंदुस्थान आहे. आम्ही लढू आणि उत्तर देऊ!’
































































