गरजू रुग्णांच्या महागडय़ा आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व टाटा ट्रस्टमध्ये करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व टाटा ट्रस्टमध्ये करार झाला आहे. या करारामुळे यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागडय़ा उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील 9 गरजू रुग्णांना 89 लाख 60 हजार 301 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात फेब्रुवारीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. अशा स्वरूपाचा हा पहिलाच करार असून, त्याअंतर्गत राज्यातील 150 गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कराराच्या माध्यमातून आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार तसेच मेंदूवरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांसाठी शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये समन्वय साधून उपचारासाठी मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत करण्यात येत आहे.